‘झेड १०’ हा ‘ब्लॅकबेरी १०’ मालिकेतील पहिला स्मार्टफोन कंपनीने आज भारतीय बाजारपेठेत दाखल केला. सध्या स्मार्टफोनसाठी आशिया पॅसिफिक बाजारपेठ ही सर्वात मोठी असून त्यात ब्लॅकबेरीचे अद्ययावत मॉडेल सर्वप्रथम भारतात दाखल होणे याला एक वेगळे महत्त्वा आहे. महत्त्वाचे म्हणजे रु.४३,४९० या किंमतीला उपलब्ध असलेल्या या मॉडेलमध्ये ८ भारतीय भाषांचा वापर करणे शक्य झाले आहे. त्यात सध्या मराठीचा समावेश नसला तरी येणाऱ्या काही महिन्यांमध्ये तो होऊ शकेल, असे ब्लॅकबेरीतर्फे सांगण्यात आले.
बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता रणबीर कपूर याच्या हस्ते आज दिमाखदार सोहळ्यात ब्लॅकेबरी १० आशिया आणि पॅसिफिक बाजारपेठेत दाखल होत असल्याची घोषणा कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सुनील दत्त यांनी केली. ते म्हणाले की, उद्या पासूनच भारतीय बाजारपेठेत याच्या नोंदणीस सुरुवात होईल आणि दोनच दिवसांत तो प्रत्यक्षात उपलब्धही होईल. सध्या कॅनडा आणि ब्रिटिश बाजारपेठेत ब्लॅकबेरी १० चे झेड १० हे मॉडेल उपलब्ध असून अमेरिकेमध्ये ते मार्च महिन्यात दाखल होणार आहे.
ब्लॅकबेरीची जगभरातील लोकप्रियतेची लाट ओसरण्यास प्रामुख्याने आयफोन आणि सॅमसंगच्या गॅलेक्सी मालिकेतील स्मार्टफोन जबाबदार आहेत, असे मानले जाते. ती बाजारपेठेतील घसरण रोखण्यासाठीच अद्ययावत ब्लॅकबेरी १० मालिकेतील स्मार्टफोन्स बाजारात आणण्याचा निर्णय कंपनीने घेतला असे बोलले जाते. या विषयीचा एक थेट प्रश्न पत्रकार परिषदेत विचारण्यात आला. त्यावर सुनील दत्त म्हणाले की, इतर कोणत्याही कंपन्यांशी असलेल्या स्पर्धेपेक्षाही आम्ही ग्राहकांना एक अद्ययावत आणि पूर्णपणे नवीन असा अनुभव देत आहोत, याला आमच्या दृष्टीने अधिक महत्त्व आहे.
ब्लॅकबेरी १०साठी एकूण ७० हजार अ‍ॅप्स विकसित करण्यात आली आहेत. त्यातील नऊ हजाराहून अधिक अ‍ॅप्स केवळ  भारतीयांनीच विकसित केली आहेत. यात भारतातील आठ वेगवेगळ्या भाषांमधील अ‍ॅप्सचाही समावेश आहे, असेही ते एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले.
 चेहऱ्यावरचे भावही बदला!
कितीही अ‍ॅप्स ओपन केली तरीही ऑपरेटिंग सिस्टिममध्ये कोणताही अडथळा न येणे आणि एकापाठोपाठ एक अ‍ॅप्स वेगात ओपन होणे हे या नव्या स्मार्टफोनचे वैशिष्टय़ आहे. शिवाय आता यात गेश्चर्सचाही समावेश करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे कॅमेऱ्यामध्ये अनेक नावीण्यपूर्ण सुविधाही देण्यात आल्या आहेत. यातील एका सुविधेमध्ये फोटोतील व्यक्तीच्या चेहऱ्यावरचे भावही बदलविण्याची क्षमता आहे. तर दुसऱ्या एका सुविधेमुळे तुम्हाला गाणी, फोटो, व्हिडिओ एकत्र करून एक छोटी फिल्म तयार करण्याची सोयही या नव्या स्मार्टफोनमध्ये आहे!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा