भारताच्या आलिशान मोटारींच्या बाजारवर्गाचा चेहरामोहरा बदलण्यास हातभार लावणाऱ्या बीएमडब्ल्यू आता देशातील कार-डीलरशिपलाही एक नवी उंची प्रदान करू पाहत आहे. देशातील बडय़ा धनसंपन्न ग्राहकांचा पसंतीक्रम लक्षात घेऊन २०१४ पर्यंत बीएमडब्ल्यूची देशातील आंतरराष्ट्रीय धाटणीची विक्री दालनांची संख्या प्रमुख महानगरांच्या क्षेत्रात ५० वर नेली जातील, असे बीएमडब्ल्यू ग्रुप इंडियाचे अध्यक्ष फिलीप वॉन सार यांनी स्पष्ट केले.
नरीमन पॉइंट येथील मेकर चेंबर-६ येथील बीएमडब्ल्यूच्या तब्बल २९०० चौरस फूटाच्या इन्फिनिटी कार शोरूमचे त्यांच्या हस्ते उद्घाटन झाले. अशा धाटणीची आणखी १६ विक्री दालने येत्या वर्षभरातून थाटून सध्याच्या ३४ वरून विक्री दालनांची संख्या ५० वर नेली जाईल, असे त्यांनी सांगितले. याप्रसंगी त्यांच्यासोबत इन्फिनिटी कार्सच्या व्यवस्थापकीय संचालिका व नव्या शोरूमच्या प्रमुख पूजा चौधरी उपस्थित होत्या. इन्फिनिटी कार्सनेच आलिशान बीएमडब्ल्यू मोटारी मुंबईकर ग्राहकांना वरळी येथील मुख्य शोरूमद्वारे सर्वप्रथम प्रस्तुत केल्या, कंपनीचे इंदूर (मध्यप्रदेश) येथेही शोरूम आहे.