आपल्या भागधारकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा, त्यांना खूष ठेवण्याचा कंपन्याकडून वापरला जाणारा लोकप्रिय मार्ग म्हणजे बोनस शेअर अर्थात बक्षीस समभाग होय. गुंतवणूकदारांना अशी समभागांची बक्षिसी देण्याची कारणे कंपनीसापेक्ष वेगवेगळी असली तरी २०१३ सालात अनेक कंपन्यांना अपरिहार्यपणे तर काहींना प्रसंगाचे औचित्य म्हणून आब राखण्यासाठी हा मार्ग स्वीकारावा लागण्याचे संकेत आहेत.
गेल्या अडीच-तीन वर्षांच्या बाजारमंदीनंतर २०१३ साल हे सेन्सेक्स-निफ्टीच्या नव्या उच्चांकाचे राहील, याबद्दल बहुतांश बाजार-विश्लेषकांमध्ये एकमत होत असल्याचे दिसत आहे. तेजीची मनोदशा असलेल्या बाजारात मग एरव्हीही बक्षीस समभाग देण्याची कंपन्यांमध्ये अहमहमिका सुरू होते. विशेषत: बराच काळ ठराविक आवर्तनात हेलकावे घेत असलेल्या समभागाच्या भावाला स्फुरण देण्यासाठी ‘बोनस’चा मार्ग प्रवर्तकांकडून वापरात आणला जातो.
कंपन्यांकडून गुंतवणूकदारांना बक्षीस समभाग देण्याच्या विविध कारणांमध्ये अनेकदा रौप्य, सुवर्ण, हीरक अथवा अमृतमहोत्सव अशा खास क्षणांचे औचित्य साधण्याचाही आजवरचा प्रघात आहे. याच औचित्याला धरून मग येत्या वर्षांत बक्षीस समभाग देऊ शकणाऱ्या १५ कंपन्यांची नावे पुढे येताना दिसते. उल्लेखनीय म्हणजे बक्षीस समभागांच्या अपेक्षेने १५ पैकी केवळ ‘भेल’वगळता अन्य सर्व कंपन्यांच्या समभागांचे भाव वर्षांतील उच्चांकी पातळी ओलांडण्याच्या स्तरावर पोहचले आहेत.
सोबतच्या चौकटीतील संभाव्य १५ कंपन्यांपैकी निम्म्याहून अधिक म्हणजे आठ या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या आहेत, तर त्यात पाच राष्ट्रीयीकृत बँका अथवा वित्तसंस्था आहेत. बुधवारीच लोकसभेत मंजुरीची मोहोर उमटलेल्या बँकिंग कायदा दुरुस्त्यांमुळे आता राष्ट्रीयीकृत बँकांना त्यांची भांडवलाची चणचण दूर करण्यासाठी बक्षीस समभाग अथवा हक्कभाग विक्रीचा मार्ग खुला झाला आहे. त्यामुळे स्थापनेपासून ५०वे अथवा ७५ वे वर्ष साजरे करण्याच्या बरोबरीने या बँकांना आपल्या गुंतवणूकदारांना ‘बोनस’ची खूषखबर देण्याचे आयते निमित्तही सापडणार आहे.
बिगर-प्रवर्तक साधारण गुंतवणूकदारांचा कंपनीच्या भागभांडवलातील हिस्सा ‘सेबी’च्या दंडकानुसार ३० जून २०१३ पूर्वी किमान २५ टक्क्यांवर आणणे शेअर बाजारात सूचिबद्ध सर्व कंपन्यांना अनिवार्य ठरणार आहे. प्रवर्तकांकडे ७५ टक्के अथवा त्यापेक्षा जास्त भाग हिस्सा असलेल्या खासगी व बहुराष्ट्रीय कंपन्यांची संख्या जवळपास १७९ इतकी आहे. प्रवर्तकांचा हिस्सा सौम्य करण्यासाठी ‘सेबी’ने अशा कंपन्यांना प्रवर्तक नसलेल्या भागधारकांमध्ये तो बक्षीस समभागांच्या रूपाने वितरीत करण्याला मुभा दिली आहे. गॅमन इन्फ्रा या अशाच एका खासगी कंपनीने बुधवारी (१८ डिसेंबरला), भागधारकांच्या हाती असलेल्या प्रत्येकी ३४ समभागांमागे १ समभाग बक्षीस (१:३४ बक्षीस) देण्याची घोषणा करून, ‘सेबी’ने सुचविलेला मार्ग अनुसरला आहे. तर गेल्या दोन महिन्यात पेन्टाकी ऑरगॅनी (२:३ बक्षीस), वेस्टलाइफ (१:१ बक्षीस) देऊन, सामान्य गुंतवणूकदारांचा हिस्सा २५ टक्क्यांवर आणला आहे. येत्या काही महिन्यात या कंपन्यांच्या पावलावर पाऊल ठेवून विविध कंपन्यांकडून बोनस व हक्कभाग विक्री घोषित होणे अपेक्षित आहे.
‘बोनस’चे उमदे औचित्य
आगामी २०१३ साल गुंतवणूकदारांसाठी समभाग-बक्षिसीचे!
आपल्या भागधारकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा, त्यांना खूष ठेवण्याचा कंपन्याकडून वापरला जाणारा लोकप्रिय मार्ग म्हणजे बोनस शेअर अर्थात बक्षीस समभाग होय. गुंतवणूकदारांना अशी समभागांची बक्षिसी देण्याची कारणे कंपनीसापेक्ष वेगवेगळी असली तरी २०१३ सालात अनेक कंपन्यांना अपरिहार्यपणे तर काहींना प्रसंगाचे औचित्य म्हणून आब राखण्यासाठी हा मार्ग स्वीकारावा लागण्याचे संकेत आहेत.

First published on: 20-12-2012 at 12:10 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bonus shares for investors in coming year