आयसीआयसीआय बँक लिमिटेड या भारतातील सर्वात मोठ्या खासगी बँकेने बँकिंग सुविधांपासून वंचित असलेल्या भागांत बँकिंग सुविधा पुरवण्याच्या हेतूने आखलेल्या आर्थिक समावेशकता योजनेचा भाग म्हणून ब्रँच ऑन व्हील्स सुरू केल्याची घोषणा केली. भारतातील कोणत्याही खासगी बँकेने सुरू केलेल्या अशा प्रकारच्या ब्रँच ऑन व्हील्स या पहिल्या उपक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्रातील कोल्हापूर येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि आयसीआयसीआय बँकेचे कार्यकारी संचालक राजीव सभरवाल यांच्या हस्ते झाले.
ब्रँच ऑॅन व्हील्स ही एटीएमसहित असलेली मोबाइल शाखा असून ती बचत खाते, कर्जे, रोख रक्कम भरणे वा काढणे, खात्यातील बॅलन्सविषयी माहिती, स्टेटमेंट प्रिंटिंग व निधी हस्तांतर/डीडी/पीओ कलेक्शन आदी मूलभूत बँकिंग सेवा व उत्पादने देते.
एटीएमसहित असलेली ही मोबाइल शाखा ठराविक व बँकिंग सुविधा नसलेल्या गावांमध्ये दिवसातील विशिष्ट वेळी एका व्हॅनमार्फत चालवली जाईल व ती गावात एका ठराविक ठिकाणी थांबेल. यामध्ये जीपीएस ट्रॅकिंग सिस्टिम, ३जी कनेक्शनसहित लॅपटॉप, एलईडी टीव्ही, लॉकर, प्रिंटर, पब्लिक अनाउन्समेंट सिस्टिम, बनावट धनादेश शोधू शकणारा यूव्ही लॅम्प, नोटांची मोजणी करणारे व त्यांची सत्यता पडताळणारे मशीन आणि कमी वजनाचे एटीएम यांचा समावेश असेल. आयसीआयसीआय एटीएमसहित मोबाइल शाखेचे व्यवस्थापन बँकेचे दोन अधिकारी आणि सुरक्षारक्षक करतील.
शाखेच्या उद्घाटनसमारंभाचे प्रमुख पाहुणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, एटीएमसहित मोबाइल शाखा सुरू करण्याच्या या उपक्रमामुळे महाराष्ट्रातील बँकिंग सेवांपासून वंचित गावांना मूलभूत बँकिंग सुविधा पुरवल्या जातील, याची खात्री वाटते. आर्थिक समावेशकता हे महाराष्ट्र सरकारचे मुख्य उद्दिष्ट आहे आणि या बाबतीत आयसीआयसीआय बँक महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे पाहून समाधान वाटले.
कोल्हापूर येथे पहिल्या ब्रँच ऑन व्हील्सच्या उद्घाटनापासून बँकेच्या महाराष्ट्रातील विविध उपक्रमांची सुरुवात झाली आहे. बँकेच्या भारतभरात एकूण ३०८ ग्रामीण शाखा आहेत. महाराष्ट्रात ही बँक ९ एनजीओंसोबत काम करते व ९२५० सेल्फ हेल्प ग्रूपपर्यंत पोहोचते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा