आंतरजाल अर्थात इंटरनेट हे संपूर्ण देशाची नव्हे तर देशाच्या सीमेपल्याड आपले सेवा-उत्पादन पोहोचविणारी बाजारपेठ अल्पखर्चात पालथी घालण्याचे आधुनिक साधन आज साऱ्यांनाच खुणावत आहे. काही हजारांत असलेली उलाढाल तडक लक्षावधीच्या पातळीवर पोहोचविणारे हे डिजिटल संक्रमण अर्थात ई-व्यापाराचे बळ छोटय़ा-मोठय़ा उद्योग-व्यासायिकांना पुरविणारी सेवा ‘ब्राऊनटेप’ या नवउद्यमी उपक्रमाने उपलब्ध केली आहे.
मुंबईत केवळ धारावीत शोरूम असलेली ‘बॅग्ज आर अस’ ही चर्म-उत्पादनांची नाममुद्रा असो, लुधियानाची गरम कपडय़ाची ‘रोझ रोझरी’ असो अथवा इंदूरची ‘रंग रेज’ हस्तकलेची उत्पादने आज सर्व आघाडीच्या ई-कॉमर्स संकेतस्थळावरून आसेतु-हिमाचल विकली जाणे, हा त्या उद्योजकांच्या दृष्टीने निश्चितच विलक्षण अनुभव म्हणता येईल. फ्लिफकार्ट, अॅमेझॉन, मिंत्रा, स्नॅपडील अशा दोन डझनांहून अधिक संकेतस्थळांवर विक्रीसाठी एकाच वेळी उत्पादने ठेवणे आणि त्यांचे व्यवस्थापन पाहणे या छोटय़ा उद्योगांच्या आवाक्याबाहेरील गोष्टीत आमचे सहकार्य मदतकारक ठरते, असे ब्राऊनटेप टेक्नॉलॉजीज प्रा. लि.चे संस्थापक गुरप्रीत सिंग यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. केवळ विक्रेत्या संकेतस्थळाशी संधान जोडून देणे नव्हे, तर अनेक बाबींची काळजीही ब्राऊनटेपकडूनच वाहिली जाते, असे त्यांनी स्पष्ट केले.
२०१२ सालच्या अखेरीस स्थापित या कंपनीकडून सध्या ४०० हून अधिक देशभरातील उत्पादकांच्या ई-व्यापारात सहभागाची स्वप्नपूर्ती केली असून, या माध्यमातून डिसेंबर २०१५ पर्यंत त्यांना ५५० कोटी रुपयांहून अधिक विक्री उलाढाल गाठण्यास साहाय्य केले आहे. भारतात ई-व्यापारात वाढीच्या शक्यता अमर्याद असून, अनेकांना आपलीही उत्पादने इंटरनेटद्वारे विकली जाणे वाटणेही स्वाभाविक आहे, परंतु वेगवेगळ्या ई-व्यापार संकेतस्थळांकडे नोंदणी करणे, उत्पादनांच्या विक्रीला चालना देणारे विशेष उपाय, प्रमोशन्स, मालाच्या किमती, लेबल्स व पॅकेजिंग, त्यांचे चित्तवेधक डिजिटल कॅटलॉग्ज, इन्व्हेंटरीचा सांभाळ आणि तिचे वेगवेगळ्या बाजारस्थळी एकीकरण, अंतिमत: ग्राहकांपर्यंत उत्पादन पोहोचते करणे वगैरे बाबी सांभाळून, उत्पादनांची निर्मिती व गुणवत्ताही सांभाळणे अनेकांसाठी कठीणच ठरते. अशा ठिकाणी ब्राऊनटेपचे योगदान त्यांच्यासाठी मोलाचेच ठरते, असे गुरप्रीत यांनी सांगितले.
सध्याची चढती कमान पाहता, दरसाल ४० टक्के वाढीसह २०२० साली भारताची ई-व्यापारातील उलाढाल दुपटीने वाढून १३ ते १५ लाख कोटी रुपयांच्या घरात गेलेली असेल, असा गुरप्रीत यांचा कयास आहे.

Story img Loader