व्यापार व गुंतवणूक धोरणात सुधारणा करून समन्वय साधताना कुठलीही बचावात्मक (कातडीबचाऊ)पावले उचलली जाणार नाहीत, असे आश्वासन भारतासह सर्व ब्रिक्स देशांनी येथे दिले आहे. व्यापारमंत्री पातळीवरील या बैठकीस भारताच्या व्यापारमंत्री निर्मला सीतारामन उपस्थित होत्या.
ब्रिक्स बैठकीच्या वेळी असे सांगण्यात आले की, जागतिक व्यापार संघटनेशी सुसंगत नसलेल्या बचावात्मक उपायांचा अवलंब केला जाणार नाही. विकसनशील देशांना विशेष व वेगळ्या पद्धतीने आदराची वागणूक दिली जाईल असे सहाव्या ब्रिक्स परिषदेच्या वेळी काढण्यात आलेल्या संयुक्त जाहीरनाम्यात म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत आलेल्या व्यापार मंत्री निर्मला सीतारामन ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका या देशांच्या व्यापार मंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित होत्या.
जागतिक अर्थव्यवस्था फार धिम्या गतीने पूर्वपदावर येत असल्याबाबत चिंता व्यक्त करून या देशांच्या मंत्र्यांनी सांगितले की, आर्थिक वाढीबाबत अनिश्चितता, त्याला विकसनशील देशांचा धोरणात्मक प्रतिसाद यामुळे आर्थिक बाजारपेठात हालचाली वाढत असून त्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेवरही होईल.
आंतरराष्ट्रीय प्रशासन यंत्रणा सुधारल्यास धोरणांचा समन्वय योग्य प्रकारे होईल व त्यातून जागतिक पातळीवर आर्थिक भरभराटीचा मार्ग खुला होईल.
आर्थिक वातावरण आव्हानात्मक असले तरी ब्रिक्स देश जागतिक अर्थव्यवस्थेला मंदीसदृश वातावरणातून बाहेर काढण्यास मदत करतील. इ व्यापारात सहकार्य वाढवून संधी निर्माण करता येतील तसेच आर्थिक सहकार्य वाढवता येईल असे या जाहीरनाम्यात म्हटले आहे.
ई व्यापाराबाबत ब्रिक्स तज्ञ समिती नेमण्याच्या प्रस्तावाचे त्यात स्वागत करण्यात आले आहे. बाली येथील मंत्रिपातळीवरील बैठकीत ठरवलेली उद्दिष्टे साध्य करण्यासाठी जागतिक व्यापार संघटनेशी कालबद्ध चर्चा करण्याचेही ठरवण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा