भारतातील वाहन उद्योग तसेच नजीकच्या देशांमध्ये निर्यात व्यवसायाचे उद्दिष्ट ठेवून, वाहन क्षेत्राला दरवाजे, आसने आणि इलेक्ट्रिक मोटर व ड्राइव्ह सिस्टीम्सचा पुरवठादार असलेल्या ब्रोझे इंडियाने आपल्या पुण्यातील प्रकल्पात विस्तार केला आहे. सध्याच्या तुलनेत अधिक मोठय़ा अशा ४६,००० चौरस फूट क्षेत्रफळावरील या नव्या प्रकल्पाने २०१५ पासून वार्षिक २४ लाख युनिट्सची उत्पादन क्षमता गाठणे अपेक्षित आहे.
जगातील पाच बडय़ा कौटुंबिक मालकी असलेल्या उद्योगघराण्यापैकी एक आणि जर्मनीमध्ये मुख्यालय असलेल्या ब्रोझे समूहाने २००६ साली भारतात प्रवेश केला. जगभरात ४० हून अधिक वाहन उद्योगातील जागतिक नाममुद्रांचा पुरवठादार असलेल्या ब्रोझे इंडियाच्या भारतातील ग्राहकांमध्ये जनरल मोटर्स, फोर्ड, निस्सान, महिंद्र अॅण्ड महिंद्र, टाटा मोटर्स, होंडा आदींचा समावेश होतो. कंपनीने आर्थिक वर्षांअखेर (डिसेंबर २०१४ अखेर) जागतिक व्यवसायातून ५ अब्ज युरोचा (सुमारे ४१८ अब्ज रुपये) महसूल अपेक्षिला असून, यापैकी युरोप-अमेरिकेचा ८० टक्क्यांच्या घरात असून, उर्वरित हिस्सा हा आशियाई देशांचा आहे. ब्रोझे इंडियाचे अध्यक्ष अश्विनी अगरवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्रोझेसाठी आशियाई, विशेषत: भारतीय बाजारपेठ अत्यंत महत्त्वाची असून, सध्या आशियाई देशांच्या ८०० दशलक्ष युरोंच्या महसुली योगदानात केवळ चीनचा वाटा तब्बल ६०० दशलक्ष युरोंचा असला, तरी नजीकच्या काळात भारताचे योगदानही लक्षणीयरीत्या वाढण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. देशांतर्गत निवडणुकांनंतर नवीन सरकार आल्याने गेली दोन-अडीच-तीन वर्षे मरगळलेल्या वाहन बाजारपेठेत उत्साह येईल आणि नव्या प्रकल्पामुळे विस्तारलेली उत्पादन क्षमता पूर्णपणे वापरली जाण्याबाबतही ते आशावादी दिसून आले. परिणामी आगामी काही वर्षांत भारतातील वार्षिक उलाढाल ४०० कोटी रुपयांपल्याड (५० दशलक्ष युरो) जाऊ शकेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
वाहन उद्योगाची पुरवठादार ब्रोझे इंडियाचा पुण्यात विस्तार प्रकल्प
भारतातील वाहन उद्योग तसेच नजीकच्या देशांमध्ये निर्यात व्यवसायाचे उद्दिष्ट ठेवून, वाहन क्षेत्राला दरवाजे, आसने आणि इलेक्ट्रिक मोटर व ड्राइव्ह सिस्टीम्सचा पुरवठादार असलेल्या ब्रोझे इंडियाने आपल्या पुण्यातील प्रकल्पात विस्तार केला आहे.
First published on: 29-04-2014 at 01:07 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Broze india on automobile sector company expand its project in pune