Budget 2019 : निफ्टी निर्देशांकही १०,८०० पुढे!
Budget 2019 : अमेरिकी फेडरल रिझव्र्हने स्थिर व्याजदराचे पतधोरण जाहीर केल्यानंतर त्याचे दमदार स्वागत येथील भांडवली बाजारात गुरुवारी झाले. महिन्यातील वायदापूर्तीच्या अखेरच्या व्यवहारात सेन्सेक्सने ६६५ अंशांची उसळी घेतली. तर निफ्टी १०,८०० च्या पुढे मजल मारली. प्रमुख निर्देशांक सप्ताहअखेर शुक्रवारी जाहीर होणाऱ्या लेखानुदानावर प्रतिक्रिया देण्याची शक्यता आहे.
भांडवली बाजारात गुरुवारी महिन्यातील वायदापूर्तीचे अखेरचे व्यवहार झाले. यापूर्वीच्या सलग चार व्यवहारांमध्ये प्रमुख निर्देशांकांमध्ये घसरण नोंदली गेली आहे. गुरुवारी सेन्सेक्स ६६५.४४ अंश वाढीसह ३६,२५६.६९ वर तर निफ्टी १७९.१५ अंश वाढीने १०,८३०.९५ पर्यंत पोहोचला.
गुरुवारच्या एकाच व्यवहारातील मोठय़ा वाढीने दोन्ही प्रमुख निर्देशांक त्यांच्या अनोख्या टप्प्यापुढे गेले. तर मुंबई शेअर बाजारातील सर्व क्षेत्रीय निर्देशांक तेजीच्या यादीत राहिले. त्यातही माहिती तंत्रज्ञान, बँक, ऊर्जा निर्देशांकांतील वाढीचे प्रमाण अधिक राहिले.
सेन्सेक्समध्ये अॅक्सिस बँक, टाटा मोटर्स, इन्फोसिस, कोटक महिंद्र बँक, एचडीएफसी बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, बजाज ऑटो, स्टेट बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर, टाटा स्टील, वेदांता, एचडीएफसी लिमिटेड, टीसीएस, आयटीसी, सन फार्मा आदी जवळपास ५ टक्क्यांपर्यंत वाढले.
जागतिक भांडवली बाजारात आशिया तसेच युरोपीय प्रमुख निर्देशांकही गुरुवारी तेजीत राहिले. आंतरराष्ट्रीय बाजारातील खनिज तेल व डॉलरचे मूल्य याचा अधिक परिणाम तेथे जाणवला. भारतात रिझव्र्ह बँकेचे पतधोरण येत्या आठवडय़ात जाहीर होणार आहे.