सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण नोंदविताना सेन्सेक्स गुरुवारी जवळपास तीन महिन्याच्या नीचांकावर येऊन ठेपला. युरोपीयन तसेच आशियाई भांडवली बाजारातील चिंतेत सामील होत मुंबई शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक आता २० हजारांवर येऊन स्थिरावला आहे. अमेरिकेच्या फेडरल रिझव्र्हने आर्थिक उपाययोजना माघारी घेण्याचे संकेत दिल्याने सेन्सेक्समध्ये एकाच व्यवहारात ४०६ अंश आपटी नोंदविली.
अमेरिकेच्या फेडरल रिझव्र्हने पुन्हा आर्थिक उपाययोजना माघारी घेण्याचे संकेत दिले आहेत. गेल्या काही कालावधीत बिकट अवस्थेत असलेल्या या देशाची अर्थस्थिती सुधारल्यास या उपाययोजना मुदतीपूर्वी परत घेतल्या जातील, अशी शक्यता जागतिक महासत्तेच्या प्रमुख बँकेने व्यक्त केली. यानंतर अनेक विकसित देशांसह आशियाईमधील प्रमुख भांडवली बाजारात नकारात्मक प्रतिक्रिया नोंदली गेली. अमेरिकन अर्थव्यवस्थेला सावरणारे ८५ अब्ज डॉलरचे रोखे खरेदी उपाय तूर्त कायम आहेत. मात्र ते केव्हाही मागे घेण्याच्या हालचाली सुरू आहेत. मध्यवर्ती बँकेच्या ऑक्टोबरमध्ये झालेल्या बैठकीत याबाबतचे सूतोवाच सर्वप्रथम करण्यात आले होते.
त्याचाच कित्ता येथील भांडवली बाजारातही गिरविलेला पाहायला मिळाला. सेन्सेक्स सलग दुसऱ्या दिवशी नकारात्मक कामगिरी बजाविताना गुरुवारी तब्बल दोन टक्क्य़ांनी खालावला. त्यामुळे तो २०,२२९.०५ पर्यंत खाली आला. ४०६.०८ अशी ३ सप्टेंबरनंतरही ही सर्वात मोठी घसरण राहिली. त्या वेळी मुंबई निर्देशांक तब्बल ६५२ अंशांनी आपटला होता. टक्केवारीत हे प्रमाण ३.४५ टक्के होते. सेन्सेक्समधील सर्व तीसही कंपन्यांचे समभाग घसरले. यामध्ये सेसा स्टरलाइट, एचडीएफसी, लार्सन अॅण्ड टुब्रो यांचा क्रम वरचा होता, तर सर्व १३ क्षेत्रीय निर्देशांकांनीही हाच क्रम राखला. त्यातही सर्वाधिक फटका भांडवली वस्तू, बांधकाम क्षेत्राला बसला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १२३.८५ अंशांनी खाली येत ६ हजारालाही मागे टाकता झाला. निफ्टी आता ५,९९९.०५ अशा स्तरावर आला आहे.

गुंतवणूकदार लाख कोटींनी कंगाल
गुरुवारच्या ११ आठवडय़ांनंतरच्या सर्वात मोठय़ा घसरणीने मुंबई शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची मालमत्ता एकाच व्यवहारात १.१८ लाख कोटी रुपयांनी रोडावली. ती आता ६६,३८,८४९ कोटी रुपयांवर येऊन ठेपली आहे. मुंबई शेअर बाजारातील १,५५२ कंपनी समभागांचे मूल्य रोडावले, तर ८२ कंपनी समभाग त्यांच्या गेल्या वर्षभराच्या तळात विसावले. ९२२ कंपनी समभागांना याही स्थितीत वरचा भाव मिळाला, तर १९ कंपनी समभागांच्या मूल्यांनी ५२ आठवडय़ांच्या वरचा टप्पा गाठला.

रुपया पुन्हा घसरला
सलग दुसऱ्या दिवशी भारतीय चलन रोडावले. डॉलरच्या तुलनेत रुपयाला गुरुवारी ६२.९३ रुपये स्तर मिळाला. कालच्या व्यवहारापेक्षा त्यात ३६ पैशांची घसरण झाली. गेल्या सलग दोन व्यवहारांपासून चलन कमकुवत झाले आहे. तत्पूर्वी आठवडाभर त्यात तेजी नोंदवली गेली आहे. ती १३० पैशांपेक्षाही अधिक आहे. मे आणि ऑगस्टनंतर भारतीय चलन गेल्या काही दिवसात सुधारले. मात्र आता त्यात पुन्हा घसरण होत आहे. असे असूनही चलनाची सध्याची पातळी बाजारकलानुसारच असल्याचे वक्तव्य केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी विदेश दौऱ्यादरम्यान केले आहे.

Story img Loader