बडय़ा गुंतवणूकदारांकडून आजमावला गेलेला एक पर्याय ‘पार्टिसिपेटरी नोट्स’ अर्थात पी-नोट्सवरील ‘सेबी’च्या नव्या नियमावलीसंबंधाने बळावलेली चिंता तसेच जोडीला नफेखोरीच्या परिणामी मंगळवारच्या व्यवहारात भांडवली बाजारात सलग तीन दिवस सुरू राहिलेल्या ऐतिहासिक उच्चांकी दौडीला लगाम बसला. सेन्सेक्स व निफ्टी दोन्ही निर्देशांक त्यांच्या शिखर टप्प्यापासून ढळले, इतकेच नाही तर त्यांनी गेल्या दीड महिन्यातील सर्वात मोठी आपटीही नोंदविली.
१६१.४९ अंश घसरणीसह सेन्सेक्स २८,५००च्या आत २८,३३८.०५ वर, तर ६७.०५ अंश आपटीसह निफ्टी ८५००च्या खाली ८४६३.१० वर स्थिरावला. सेन्सेक्सची तर १६ ऑक्टोबरच्या एकाच व्यवहारातील ३५० अंश घसरणीनंतरची मंगळवारची आपटी मोठी ठरली. सलग तीन व्यवहारांत मुंबई निर्देशांक ४६६.६९ अंशांनी वधारला होता.
सेन्सेक्स २८,५००च्या तर निफ्टी ८५००च्या वर जाताना सोमवारी ऐतिहासिक टप्प्यावर विराजमान झाला होता. मंगळवारची सुरुवातही सेन्सेक्सने त्यापुढे जात २८,५२०.७६ ने केली. लगेच तो २८,५४१.२२ पर्यंत झेपावलाही. यानंतर मात्र त्यात घसरण नोंदली गेली व सेन्सेक्स दिवसअखेर नकारात्मक स्थितीत स्थिरावला.
विदेशी गुंतवणूकदारांचा पी-नोट्स हा पसंतीचा भांडवली बाजारातील गुंतवणुकीचा पर्याय आहे. मात्र वाढत्या काळ्यापैशाच्या भीतीने यापुढे याद्वारे गुंतवणूक करताना माहिती पुरविण्यासह अत्यावश्यक उपाययोजना करण्याचे आदेश सेबीने जारी केल्याने बाजारात नाराजी पसरली. त्यातच दोनच दिवसांनी (गुरुवारी) महिन्यातील वायदापूर्तीचे व्यवहार होणार असल्याने गुंतवणूकदारांनीही नफेखोरीचा मार्ग अवलंबिला.
मुंबई शेअर बाजारात स्थावर मालमत्ता, ऊर्जा, पोलाद, ग्राहकोपयोगी वस्तू, बँक, भांडवली वस्तू, वाहन या क्षेत्रातील समभाग घसरले. यामध्ये स्थावर मालमत्ता सर्वाधिक ३.३५ टक्क्य़ांनी खाली आला. तर सेन्सेक्समधील ३० पैकी निम्मे समभागांचे मूल्य रोडावले. त्यातही आयटीसीसह टाटा स्टील, आयसीआयसीआय बँक, एनटीपीसी, एल अॅण्ड टी अशा संमिश्र समभागांचा समावेश राहिला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा