ऐतिहासिक उच्चांकाची हॅट्ट्रिक नोंदविणारा सेन्सेक्स गुरुवारी २९ हजारांच्या अभूतपूर्व शिखरावर पोहोचला. सलग तिसऱ्या सत्रात मुंबई निर्देशांकाने नवा विक्रम राखला आहे.
मुंबई शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक गुरुवारी ११७.१६ अंश वाढीसह २९,००६.०२ वर स्थिरावला. तर ३१.९० अंश वाढीमुळे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ८,७७४.१५ पर्यंत बंद झाला.
भांडवली बाजारातील ही तेजी गेल्या सहा सत्रांपासून कायम आहे. यादरम्यान मुंबई निर्देशांकाने १,६५९.२० अंश वाढ नोंदविली आहे. सेन्सेक्सला हजार अंशांची झेप घेण्यास अवघे २२ व्यवहार सत्र लागले आहेत.
२८ हजारांपासूनचा मुंबई निर्देशांकाचा प्रवास १२ नोव्हेंबरला होता. गुरुवारी सुरुवातीच्या सत्रातच सेन्सेक्सने २९ हजारांला गाठले होते. तर निफ्टीने त्याचा ८,७०० हा टप्पा मंगळवारीच पार केला.
अर्थसंकटात असलेल्या युरोपातील मध्यवर्ती बँकेमार्फत आर्थिक उपाययोजनांची घोषणा (गुरुवारी उशिरा) होण्यापूर्वी येथील भांडवली बाजारातून नफा काढून घेण्याचा प्रयत्न गुंतवणूकदारांकडून गुरुवारी पुन्हा झाला. यापूर्वी मंगळवार व बुधवारीही गुंतवणूकदारांनी समभाग खरेदीचा कित्ता गिरविला. येत्या महिनाअखेर सादर होणाऱ्या सर्वसाधारण अर्थसंकल्पात नरेंद्र मोदी सरकारच्या आर्थिक सुधारणांचे चित्र उमटेल या आशेवरही बाजारातील व्यवहार तेजीचा प्रवास करत आहेत. बाजारात विदेशी गुंतवणुकीचा ओघही वाढत आहे.
मुंबई शेअर बाजारात गुरुवारी आरोग्यनिगा, भांडवली वस्तू, वाहन क्षेत्रातील समभागांना मागणी राहिली. सेन्सेक्समध्ये औषध निर्मितीतील सन फार्मा ३.६५ टक्क्यांसह आघाडीवर राहिला.
पाठोपाठ अॅक्सिस बँक, टाटा मोटर्स, ओएनजीसी, सिप्ला, टाटा स्टील, इन्फोसिस, कोल इंडिया, विप्रोचेही समभाग मूल्य वाढले. रिलायन्स इंडस्ट्रिज, हिरो मोटोकॉर्प, मारुती सुझुकी हे आघाडीचे समभाग मात्र एकूण बाजारातील तेजीत आपले स्थान निर्माण करू शकले नाही. मिड व स्मॉल कॅपही अनुक्रमे ०.०७ व ०.२३ टक्क्यांनी वाढले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा