गेल्या सलग पाच सत्रांतील भांडवली बाजाराच्या तेजीला मंगळवारी अखेर किरकोळ घसरणीने पायबंद बसला. व्यवहारात तीन वर्षांच्या उच्चांकाला स्पर्श केल्यानंतर सेन्सेक्स ५९.९२ अंश घसरणीसह २०,५४७.६२ वर बंद झाला. असे असले तरी मुंबई निर्देशांक अद्याप २०,५००च्या पुढे कायम आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २३.६५ अंश घसरणीसह ६,०८९.०५ वर येऊन ठेपला.
गेल्या पाचही व्यवहारांत सेन्सेक्सने ७१२ अंशांची भर घातली आहे. यामुळे प्रमुख निर्देशांक २०,५००च्या पुढे गेला आहे. मंगळवारीदेखील सकाळच्या व्यवहारात सेन्सेक्स वधारणेसह सुरुवात करता झाला. दिवसभरातील त्याचा हा क्रम कायम होता. परिणामी तो ११ नोव्हेंबर २०११नंतर प्रथमच २०,७५९.५८ वर पोहोचला. दिवसअखेर मात्र त्यात किरकोळ घसरण नोंदली गेली. त्याचबरोबर गेल्या पाच सत्रांतील वाढही रोखली गेली.
इन्फोसिससह रिलायन्सच्या वित्तीय निष्कर्षांचे स्वागत बाजारात होत होते. मात्र वाढत्या महागाईमुळे व्याजदर कमी होण्याची शक्यता नसल्याने बँक समभागांवर दबाव होता. रिझव्र्ह बँक महिनाअखेरच्या पतधोरणात रेपो दर पाव टक्क्याने वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. बँक निर्देशांकच घसरणीत आघाडीवर होता. तर सेन्सेक्समधील १७ कंपनी समभागांचे मूल्य खालावले.
रुपयात सलग घसरण
चलन व्यवहारात डॉलरच्या तुलनेत रुपया सलग दुसऱ्या दिवशी घसरला. मंगळवारी २८ पैशांनी घसरत रुपया प्रति डॉलर ६१.८३ पर्यंत खाली आला. स्थानिक चलनाचा प्रवास पुन्हा ६२च्या तळात जाऊ पाहत आहे. चलनाने नव्या सप्ताहाचा प्रारंभ करताना सोमवारीदेखील ४८ पैशांची घट नोंदविली होती. त्यामुळे रुपया दोन व्यवहारांत ७६ पैशांनी घसरला आहे. कर्ज मर्यादेत वाढीबाबत अमेरिकी सरकारपुढे असलेली १७ ऑक्टोबर ही मुदत जवळ येत असताना डॉलर अधिक भक्कम होत चालले आहे. रुपया आता आठवडय़ापूर्वीच्या नीचांक पातळीवर येऊन ठेपला आहे.
दरम्यान, बुधवारी बकरी ईदनिमित्त भांडवली बाजारासह परकी चलन तसेच सराफा व्यवहार बंद राहणार आहेत.

Story img Loader