व्यवहारात २८ हजारांचा टप्पा गाठणारा मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सप्ताहअखेर महिन्याच्या उच्चांकावर पोहोचला. दिवसअखेर १४८.१५ अंशवाढीसह सेन्सेक्स २७,९५७.५० पर्यंत गेला. तर निफ्टी ३७.९५ अंश वाढीने ८,४५८.९५ वर पोहोचला.
कंपन्यांच्या तिमाही वित्तीय निकालाच्या जोरावर भांडवली बाजारात पुन्हा एकदा खरेदीचा जोर दिसला. असे करताना सेन्सेक्स दिवसभरात २८०००ला स्पर्श करता झाला, तर निफ्टीनेही ८,५०० नजीकचा प्रवास नोंदविला.
निफ्टी सत्रात ८,४८९.५५ पर्यंत तर सेन्सेक्स २८,०७१.१६ वर गेला होता. सेन्सेक्सने यापूर्वी १७ एप्रिल रोजी २८,४४२.१० ही मजल मारली आहे. शुक्रवारच्या दोन्ही प्रमुख निर्देशांकातील तेजीमुळे भांडवली बाजार आता महिन्याच्या उच्चांकाला आहेत.
मुंबई शेअर बाजारात शुक्रवारी माहिती तंत्रज्ञान, औषधनिर्मिती, भांडवली वस्तू, तेल व वायू क्षेत्रातील समभागांना मागणी राहिली. तर व्याजदराशी निगडित स्थावर मालमत्ता, बँक, ग्राहकोपयोगी वस्तू क्षेत्रातील समभागांमध्ये नफेखोरी अनुभवली गेली.
सेन्सेक्समधील ३० समभागांमध्ये एचडीएफसी सर्वात आघाडीवर राहिला. त्यात २.५१ टक्के मूल्यवाढ झाली. तर २.४२ टक्क्यांसह टीसीएस तेजीत दुसऱ्या स्थानावर राहिला. मुंबई निर्देशांकातील १७ समभाग तेजीसह बंद झाले.
यामध्ये सन फार्मा, ओएनजीसी, लार्सन अॅण्ड टुब्रो, भेल, टाटा मोटर्स, रिलायन्स इंडस्ट्रिज आदी राहिले. तर स्थिर आयसीआयसीआय बँक वगळता इतर १२ समभागांमध्ये घसरण नोंदली गेली. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये माहिती तंत्रज्ञान ०.९१ टक्क्यासह वरचढ ठरला.
रुपयाला सलग दुसऱ्या दिवशी मजबुती
मुंबई : सलग दुसऱ्या दिवशी भक्कमता नोंदविताना रुपया सप्ताहअखेर १२ पैशांनी उंचावला. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत तो शुक्रवारी ६३.५२ वर स्थिरावला. भांडवली बाजारातील विदेशी संस्था गुंतवणूकदारांच्या परतीने रुपयाही भक्कम बनला आहे. ६३.५८ अशी वाढीची सुरुवात करणाऱ्या रुपयाने सत्रात ६३.६३ पर्यंत घसरण नोंदवित चिंता वाढविली. या दोन सत्रात रुपयात ३० पैशांनी उंचावला आहे.
‘सेन्सेक्स’ची महिन्याच्या उच्चांकावर झेप
व्यवहारात २८ हजारांचा टप्पा गाठणारा मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सप्ताहअखेर महिन्याच्या उच्चांकावर पोहोचला.
First published on: 23-05-2015 at 02:58 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bse sensex closes 148 points up at one month high