रुपयाचा घसरण-क्रम कायम असताना, भांडवली बाजारातील प्रमुख निर्देशांक मात्र ५०० हून अधिक अंशांच्या (सुमारे ३ टक्के) आपटीतून बुधवारी नाटय़मयरीत्या सावरताना दिसले. संकटसमयी सरकारसाठी कायम पैशांचा हात खुला करणाऱ्या भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसीने पडत्या बाजारात खरेदी केल्याने निर्देशांक सावरताना दिसले.
सीरियातील रक्तलांच्छित यादवीत हस्तक्षेप म्हणून अमेरिकेकडून त्या देशांवर हल्ला केला जाईल, अशा भू-राजकीय तणाव वाढविणाऱ्या घडामोडी, परिणामी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीचा भडका, तर देशांतर्गत सरकारच्या तिजोरीला भार ठरणारा अन्नसुरक्षा कायद्याने तुटीचे भोक आणखी रुंदावण्याच्या चिंतेत सकाळी रुपयाच्या प्रति डॉलर ६८.७५ पातळीपर्यंत नांगीने शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचा थरकाप उडविला.
शेअर बाजारात बुधवारी सेन्सेक्स १७,८५१.४४ स्तरावर खुला झाला आणि त्याने तासाभरात तब्बल ५२०अंश खाली लोळण घेतली. परंतु दिवसअखेर कालच्या १७९६८.०८ स्तरावरून त्याने माफक २८ अंशांची कमाई करणारी नाटय़मय कलाटणीचा प्रवास केला. अनेक आघाडीच्या समभागांच्या भावाचा झालेला पालापाचोळा पाहता, बाजारात खालच्या स्तरावर चोखंदळ खरेदी दिवसाच्या मध्यान्हीला दिसून आली. देशांतर्गत सर्वात मोठी संस्थात्मक खरेदीदार असलेल्या सरकारच्या एलआयसीकडून आज मोठय़ा प्रमाणात समभाग खरेदी झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक ‘निफ्टी’ला मात्र सकारात्मक अखेर करता आली नाही, कालच्या तुलनेत किंचित २.४५ अंशांची घट सोसत तो ५,२८५ वर परंतु दिवसातील नीचांक स्तरापासून खूप वरच्या स्तरावर बंद झाला.
सॉफ्टवेअर क्षेत्रातील टीसीएस, इन्फोसिस आणि विप्रो या तिकडीचे समभाग मात्र तेजीत होते. या तिन्ही समभागांच्या एकत्रित कमाईने ‘सेन्सेक्स’ला ९६.६३ अंशांच्या कमाईचे योगदान दिले.

Story img Loader