अस्वस्थ शेअर बाजारात गुरुवारी सेन्सेक्सने सुरुवातीच्या वाढीपासून माघार घेत बाजार बंद होताना पुन्हा नकारात्मकता दर्शविली. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या भडक्याच्या दबावापोटी तेल कंपन्यांच्या समभागांच्या विक्रीच्या माऱ्याने मुंबई निर्देशांक ४४.४५ अंश घसरणीसह २५,२०१.८० वर येऊन ठेपला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १७.५० अंश घसरणीसह ७,५४०.७० वर बंद झाला. बडय़ा गुंतवणूकदार-दलालांनी बाजाराच्या वरच्या स्तरावर नफेखोरीच्या उद्देशाने केलेल्या विक्रीनेही घसरणीस हातभार लावला.
सेन्सेक्सचा सुरुवातीचा प्रवास २५,३२७.०९ या तेजीसह सुरू झाला. तो व्यवहारात २५,४२५.८५ पर्यंत पोहोचला. विशेषत: माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील समभागांची या वेळी खरेदी होत होती. मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर तेल कंपन्यांच्या वधारत्या किमतींना येथे दबाव निर्माण केला. परिणामी सेन्सेक्स व्यवहारात थेट २५,०६९.६६ पर्यंत खाली आला. दिवसअखेरही तेल व वायू विपणन तसेच विक्री कंपन्यांचे समभाग मूल्य घसरतेच राहिले. एकूण तेल व वायू क्षेत्रीय निर्देशांक सर्वाधिक ३.११ टक्क्यांनी घसरला.
सेन्सेक्समधील २३ कंपनी समभागांचे मूल्य उतरले. त्यातही तेल कंपन्यांसह मारुती सुझुकी, कोल इंडिया, स्टेट बँक, एचडीएफसी बँक, टाटा पॉवर, लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो यांचा क्रम पुढे होता. एकूण व्यवहाराप्रमाणेच अखेरिसही टीसीएस, इन्फोसिस, विप्रो या आयटी कंपन्यांचे मूल्य वधारतेच राहिले.
तेल समभागांवरील विक्रीचा दबाव गुंतवणूकदारांकडून कायम
इराकमधील वाढत्या अस्वस्थतेतून तेल व व्ोायू समभागांची घसरण बाहेर पडण्याचा मार्ग दिसत नाही. सलग दुसऱ्या दिवशी भांडवली बाजारात या क्षेत्रातील समभागांची विक्री झाली. कच्च्या तेलाच्या वाढत्या दरवाढीपोटी समभाग थेट ६ टक्क्यांहून अधिक घसरले. सार्वजनिक क्षेत्रातील ऑइल इंडिया सर्वाधिक ६.१८ टक्क्यांनी आपटला. ओएनजीसीचा समभाग ५.१३ टक्क्यांनी घसरत ४२०.४५ रुपये या तीन वर्षांतील सुमार स्थितीत येऊन पोहोचला. एकूण सेन्सेक्सच्या घसरणीतही तो आघाडीवर राहिला. बुधवारी २ टक्क्यांनी घसरणारा रिलायन्सही गुरुवारी त्यापेक्षा अधिक, २.३८ टक्क्यांनी आपटला.
रुपयाची महिन्यातील उत्तम भर
चालू आठवडय़ातील भारतीय चलनातील चढ-उतार कायम आहे. गुरुवारी डॉलरच्या तुलनेत रुपया ३१ पैशांनी वधारत ६०.०८ पर्यंत पोहोचला. चलनाची व्यवहारातील ही गेल्या महिन्याभरातील सर्वोत्तम वाढ होती. यापूर्वी १५ मे रोजी रुपया एकाच व्यवहारात जवळपास याच मात्रेत वधारला होता. ६०.०६ या वरच्या टप्प्यावर सत्राची सुरुवात करणारा रुपया सत्रात ५९.८५ पर्यंत उंचावला. दिवसअखेर त्यात कालच्या तुलनेत ०.५१ टक्क्यांची वाढ नोंदली गेली. विद्यमान आठवडय़ात रुपया दर एक दिवसामागे वाढ आणि घट नोंदवीत आहे.
गुरुवारच्या बंदमुळे रुपया पुन्हा मंगळवारच्या स्तरावर पोहोचला आहे. तर चलनाने बुधवारी सोमवारच्या तुलनेत अधिक घसरण नोंदविली होती.
सोने-चांदीही चकाकले
परकी चलन व्यवहारात रुपयात तेजी नोंदविली जात असतानाच मुंबईच्या सराफा बाजारातही दरांची तेजी अनुभवली गेली. सोने तोळ्यामागे ३५ रुपयांनी वधारल्याने २५,५५० च्याही पुढे, २५,५७० रुपयांपर्यंत गेले.
स्टॅण्डर्ड सोने प्रकारात हे चित्र असताना १० ग्रॅमसाठीचे शुद्ध सोनेदेखीलही ३५ रुपयांनी वाढत २७,७२० रुपयांवर गेले. तर ४३ हजार रुपयांपुढे असणाऱ्या चांदीचा दर गुरुवारी ७० रुपयांनी वाढत ४३,३६५ रुपयांवर गेले.
विदेशी गुंतवणूक मर्यादा वाढीच्या चर्चेने रेल्वे समभाग उंचावले
रेल्वेमध्ये १०० टक्के थेट विदेशी गुंतवणूक मर्यादा विस्तारण्याच्या केंद्रीय वाणिज्य व व्यापार मंत्रालयाच्या संशयास्पद हालचालींनी भांडवली बाजारात मात्र या क्षेत्राशी निगडित कंपन्यांच्या समभागांनी बुधवारी भाव कमावून घेतला. तब्बल ५ टक्क्यांपर्यंत रेल्वे वाहतूक कंपन्यांचे समभाग उंचावले होते. यामध्ये कालिंदी रेल निगम सर्वाधिक ४.९८ टक्क्यांनी तर स्टोन इंडियाचा समभाग ४.९१ टक्क्यांनी, केर्नेक्स मायक्रोसिस्टिम्स इंडिया १.३२ टक्क्यांनी वधारला. संरक्षण खात्यापाठोपाठ वाणिज्य व व्यापार खात्यांतर्गत येणाऱ्या औद्योगिक धोरण आणि प्रोत्साहन मंडळाने रेल्वेतील थेट विदेशी गुंतवणूक मर्यादा वाढविण्याबाबत मसुदा तयार केल्याची जोरदार चर्चा आहे.

 

Story img Loader