भांडवली बाजारातून विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांचा ओघ काढून घेण्याची प्रक्रिया नव्या सप्ताहाच्या प्रारंभीही कायम राहिली आहे. एकाच दिवसात त्यांनी समभाग विकत २५ कोटी डॉलरचा निधी काढून घेतला आहे. भांडबली बाजारातील या आटणाऱ्या धोरणामुळे सेन्सेक्स १८,५०० पर्यंत तर निफ्टी ५,६०० नजीक येऊन ठेपला आहे. दोन्ही प्रमुख निर्देशांक त्याच्या दोन महिन्याच्या तळात पुन्हा एकदा रुतले आहे. तर सेन्सेक्समधील २३३ अंश आपटीमुळे गुंतवणूकदारांची १.१ लाख कोटी रुपयांची मालमत्ताही रोडावली आहे.
आशियाईसह युरोपीय तसेच अमेरिकन बाजारातील नकारात्मक वातावरणामुळे येथील भांडवली बाजाराची सुरुवातही सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी निराशाजनक राहिली. आयटीसीस, लार्सन अॅन्ड टुब्रो, एचडीएफसी बँक, इन्फोसिस, ओएनजीसी, स्टेट बँक, भारती एअरटेल, टीसीएस, टाटा मोटर्स, महिंद्र अॅन्ड महिंद्र, हिंदुस्थान युनिलिव्हर असे आघाडीचे समभाग घसरते राहिले. प्रत्येक १० कंपनी समभागांमध्ये ७ समभागांचे मूल्य कमालीचे खालावले होते.
सर्व १३ क्षेत्रीय निर्देशांक घसरले होते. त्यांच्यात ४.८० टक्क्यांपर्यंतची आपटी होती. बांधकाम, भांडवली वस्तू, सार्वजनिक कंपन्या या घसरणीत आघाडीवर होत्या. २३३.३५ अंश घसरणीसह १८,५४०.८९ पर्यंत खाली येणाऱ्या सेन्सेक्सचा १५ एप्रिलनंतरचा हा खालचा स्तर आहे. ७७.४० अंश घसरणीसह निफ्टीनेही आज ५,६०० च्या खालची पातळी गाठली. ५,५९०.२५ च्या तुलनेत निफ्टी यापूर्वी १५ एप्रिल रोजीच ५,५६८.४० वर होता.
स्मॉल तसेच मिड कॅपही अनुक्रमे २.१६ व २.५६ टक्क्यांनी रोडावले होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा