महिन्याच्या वायदापूर्तीचा दिवस साधत गुंतवणूकदारांनी भांडवली बाजारातील खरेदीचा ओघ गुरुवारी कायम ठेवला. ३७.६१ अंश वाढीसह सेन्सेक्स १९,८९३.८५ वर पोहोचला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी अवघ्या ८.४ टक्क्यांसह मात्र ५,८८२.२५ असा वरच्या टप्प्यावर विसावला. दिवसभरात मुंबई निर्देशांकाचा प्रवास १९,८२६.९९ ते १९,९९७.२८ असा चढता राहिला. अर्थव्यवस्थेतील रोकड टंचाई निर्माण होऊ देणार नाही, या रिझव्र्ह बँकेच्या आश्वस्तानंतर बाजारातील बँक समभागही उंचावले. व्याजदर वाढीच्या धास्तीने गेल्या काही दिवसांपासून या क्षेत्रातील समभागांमध्ये घसरण सुरू होती.  सेन्सेक्समधील आयटीसी, एचडीएफसी, सन फार्मा यांचे समभाग वधारले. तर रिलायन्स, टीसीएस, हिंदुस्थान युनिलिव्हर, ओएनजीसी यांच्या मूल्यात घसरण झाली. क्षेत्रीय निर्देशांकात तेल व वायू, बांधकाम निर्देशांक घसरले.
रुपया ३७ पैशांनी भक्कम
डॉलरच्या तुलनेत रुपयातील वाढ सलग दुसऱ्या दिवशी कायम राहिली. भारतीय चलन गुरुवारी ३७ पैशांनी भक्कम होत ६२.०७ पर्यंत वधारले. गेल्या दोन दिवसांतील रुपयातील वाढ ६८ पैशांची झाली आहे. यातून चलन आता आठवडाभराच्या उच्चांकावर पोहोचले आहे. बँकांची विदेशातून कर्ज उभारणी रिझव्र्ह बँकेने सुलभ केल्याने चलनाचा प्रवास ६२.३६ या दिवसाच्या नीचांकापासून ६१.९७ असा वधारता राहिला. तत्पूर्वी सलग चार सत्रांत तो ९८ पैशांनी घसरला आहे.

Story img Loader