सलग तिसऱ्या दिवशी घसरण नोंदवित सेन्सेक्स सप्ताहअखेर गेल्या दोन आठवडय़ाच्या तळाला पोहोचला. रिझव्र्ह बँकेच्या येत्या आठवडय़ातील पतधोरणाच्या पाश्र्वभूमिवर व्याजदराशी निगडित कंपनी समभागांच्या विक्रीने मुंबई निर्देशांक ५६.५७ अंश घसरणीने १९,७४८.१९ पर्यंत आला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २१.३० अंश घटसह ५,८८६.२० पर्यंत घसरला आहे.
आठवडय़ाभरात सेन्सेक्स ४०१.६६ अंशांनी खाली आला आहे. तर सलग तिसऱ्या सत्रात त्यात घसरण नोंदली गेली आहे. चलनातील घसरण थोपविण्यासाठी रिझव्र्ह बँकेने यापूर्वी योजलेले उपाय तसेच मध्यवर्ती बँकेमार्फत मंगळवारच्या पतधोरणात व्याजदराबाबत काही ठोस निर्णय न होण्याची अपेक्षा यामुळे बाजारात घसरण राखली गेली.
दिवसाची १९८९२.४२ अशी चांगली सुरुवात करणारा सेन्सेक्स दिवसभरात १९,९०७.४५ पर्यंत पोहोचला खरा. मात्र दिवसअखेर त्यात घसरण नोंदली गेली. टाटा मोटर्स, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, येस बँक, येस बँक यांचे समभाग घसरणीच्या यादीत होते. पोलादासह बँक, बांधकाम निर्देशांकांनाही घसरणीला सामोरे जावे लागले.
रुपया सव्वा महिन्यांनी भक्कम
डॉलरच्या तुलनेत सातत्याने घसरत ६१ पर्यंतचा ऐतिहासिक नीचांक गाठणारा रुपया आता गेल्या सव्वा महिन्याच्या वरच्या टप्प्यावर पोहोचला आहे. चलनातील अस्थिरता रोखण्यासाठी रिझव्र्ह बँकेने काही दिवसांपासून सुरू केलेल्या प्रयत्नांना आता यश येत असल्याचे दिसू लागले आहे. भारतीय चलन शुक्रवारी ७ पैशांनी उंचावत ५९.०४ पर्यंत झेपावले. सगल तिसऱ्या दिवसातील ही रुपयातील वाढ राहिली. भारतीय चलनाने शुक्रवारच्या व्यवहाराची सुरुवात ५८.८२ अशा तेजीने केली. दिवसभरात तो ५८.६९ पर्यंत वधारला होता. दिवसअखेर त्यात ०.१२ टक्क्याची वाढ नोंदली गेली. सलग दुसऱ्या दिवशी रुपयाने ५८ ला स्पर्श केला आहे. चलनातील ही भक्कमता रिझव्र्ह बँकने गेल्या १० दिवसांमध्ये केलेल्या उपाययोजनांमुळे आल्याचे मत चलन तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
सेन्सेक्सची घसरण कायम; नजर रिझव्र्ह बँकेकडे
सलग तिसऱ्या दिवशी घसरण नोंदवित सेन्सेक्स सप्ताहअखेर गेल्या दोन आठवडय़ाच्या तळाला पोहोचला.
First published on: 27-07-2013 at 06:18 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bse sensex declines for third day down 56 points as hul falls