अमेरिकेतील ‘शट डाउन’च्या छायेत भांडवली बाजार अद्यापही कायम आहे. याच सावटाखाली नव्या सप्ताहाच्या सुरुवातीला २६८ अंशांनी आपटणारा सेन्सेक्स दिवसअखेर काहीसा सावरला. मात्र गेल्या तीन सत्रांतील तेजी त्याने अवघ्या २१ अंशांनी मोडीत काढलीच. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत नाममात्र १.१५ अंश घसरण होऊन निर्देशांक ५,९०६.१५ वर स्थिरावला.
मुंबई शेअर बाजाराने गेल्या आठवडय़ात सलग तीन व्यवहारांत तेजी नोंदविली होती. असे करताना सेन्सेक्स २० हजारांच्या सीमेवर होता. सोमवारी नव्या आठवडय़ाची सुरुवात करतानाच सेन्सेक्स १९,६४७.८८ अशा कमालीच्या किमान पातळीवर आला. या वेळी त्यात शुक्रवारच्या तुलनेत तब्बल २६८ अंशांची घट नोंदली गेली. दिवसअखेर त्यातील मोठी घसरण रोखली गेली असली तरी बाजाराने व्यवहारअखेर नकारात्मकच भूमिका बजाविली.
रिलायन्स इंडस्ट्रीज, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक यांच्या समभागांमध्ये घसरण झाली. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी समभागांमध्ये खरेदीचा जोर असल्याने बाजाराने दिवसअखेर मोठय़ा घसरणीपासून माघार घेतली. त्याचबरोबर पोलाद कंपन्यांचीही या कामी साथ राहिली. १३ क्षेत्रीय निर्देशांकांपैकी ७ घसरणीच्या यादीत नोंदले गेले. बँकांबरोबरच सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी समभागांना मूल्य नुकसान सोसावे लागले.
आला दसरा; चमकला सराफा
साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या दसऱ्याची चाहूल सराफा बाजाराला लागली आहे. शहरात सोने धातूसह चांदीच्या दरातही भर घालण्याचा क्रम सुरू झाला आहे. मुंबई सराफ बाजारात सोमवारी तोळ्याचा सोन्याचा भाव पुन्हा ३० हजारी पार करता झाला. सप्ताहाच्या पहिल्या दिवशी पिवळ्या धातूला १० ग्रॅमसाठी शनिवारच्या तुलनेत एकाच दिवसात ३५० रुपयांचा अधिक भाव मिळाला. यामुळे सोने याच वजनासाठी ३०,१५० रुपये झाले. तर शुद्ध प्रकारच्या १० ग्रॅम सोन्याचा दरही ३४० रुपयांनी वधारत ३०,३०० रुपयांवर गेला. गेल्या आठवडय़ाअखेपर्यंत सोने दर तोळ्यासाठी ३० हजारांच्या आतच होते. तर शहरात आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी चांदीचा दरही किलोमागे एकदम ३४५ रुपयांनी उंचावला. यामुळे चांदी किलोसाठी ५० हजारानजीक ४९,५७० रुपयांपर्यंत जाऊन भिडली आहे.
रुपया सात आठवडय़ांच्या उच्चांकावरून खाली उतरला
डॉलरच्या तुलनेत रुपया सप्ताहारंभी पुन्हा नरमला. ३५ पैशांनी कमकुवत भारतीय चलन ६२ च्या खाली ६१.७९ पर्यंत खाली आले. अमेरिकेतील ‘शट डाउन’मुळे व्यक्त झालेली चिंता कायम असून यामुळे विदेशी चलन भक्कम होऊ पाहत आहे. गेल्या आठवडाअखेर रुपया सात सप्ताहांच्या उच्चांकावर होता. सलग तीन सत्रांत वाढ राखत त्याने ६१.४४ पर्यंत भक्कमता नोंदविली होती. या कालावधीतील चलनाची भर ११६ पैशांची राहिली. टक्केवारीत ती १.८५ होती. सोमवारच्या घसरणीने ही तेजी मोडीत निघाली. रुपयाचा दिवसभराचा प्रवास ६१.५० ते ६१.९६ असा घसरणीचा राहिला. दिवसअखेरही घटच राहिली.

Story img Loader