जागतिक बाजारात प्रति पिंप १०५ डॉलरच्या पुढे गेलेल्या कच्च्या तेलाच्या दर, तर स्थानिक पातळीवर रुपयाने पुन्हा ६०ला घातलेल्या गवसणी याच्या परिणामी सेन्सेक्सने बुधवारी त्रिशतकी आपटी नोंदविली. दिवसभर नकारात्मक प्रवास करणारा सेन्सेक्स दिवसअखेर २८६.०६ अंश घसरणीसह १९,१७७.७६ वर येऊन ठेपला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ८६.६५ अंश घटीसह ५,८००च्या खाली, ५,७७०.९०वर स्थिरावला.
सलग तीन सत्रातील तेजीनंतर भांडवली बाजाराने मंगळवारी शतकी घसरण नोंदविली होती. बुधवारच्या व्यवहाराची सुरुवातही २११अंशांच्या नुकसानीसह झाल्याने सेन्सेक्स प्रारंभीच १९,२५२ पातळीवर उतरला. सकाळी आशियाई बाजारातही प्रमुख निर्देशांक अस्थिर बनले होते. दिवसअखेर आशियाई बाजार २.५ टक्क्यांनी खालावले. तर दुपारनंतर खुले झालेले युरोपीय बाजारांचे व्यवहारही १.५ टक्क्यांपर्यंतच्या घसरणीसहच सुरू झाले.
डॉलरच्या तुलनेत रुपया व्यवहाराच्या सुरुवातीलाच ६०च्या खाली गेला. दिवसभर तो याच पातळीवर व्यवहार करत होता. याचबरोबर प्रति पिंप १०० डॉलरच्या खाली आलेले कच्च्या तेलाच्या दरानेही आकस्मिक १०५ डॉलरवर उसळी घेऊन बाजारावरील दबाव कायम ठेवला. यामुळे चालू खात्यातील तूट अधिक विस्तारण्याच्या भीतीसह रिझव्‍‌र्ह बँकेमार्फत जुलैअखेर पतधोरणात व्याजदर कपात टाळली जाण्याच्या भीतीवर बाजाराने व्यक्त केलेली ही नकारात्मकता मानली जाते. आजच्या नकारात्मक व्यवहारामुळे गुंतवणूकदारांची मालमत्ता १.१ लाख कोटी रुपयांनी रोडावली. बाजारात आज विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी एकाच दिवसात ७०५ कोटी रुपये मूल्याची समभाग विक्री केली.
कंपन्यांना द्यावयाच्या कर्जाबाबत भांडवल पर्याप्ततेच्या तरतुदीबाबत रिझव्‍‌र्ह बँकेने जारी केलेल्या नियमावलींचा भांडवली बाजारातील बँक समभागांवर विपरीत परिणाम दिसून आला. स्टेट बँकेचे समभाग मूल्य एकाच सत्रात ४.५ टक्क्यांनी घसरताना गेल्या सहा आठवडय़ांच्या किमान पातळीवर आले. आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक यांचेही समभाग घसरले.
जागतिक बाजाराचा परिणाम येथेही पाहायला मिळाला आहे. इजिप्तमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. युरो झोनमधील पोर्तुगालमध्येही सरकारविरोधी वातावरण आहे. इटलीतही तेच चित्र आहे. चीनमध्ये आलेल्या अर्थव्यवस्थेविषयक आकडेवारीने आशियाई बाजारातही घसरण नोंदली गेली आहे. सोबतच येथील भांडवली बाजाराच्या घसरणीला रुपयाचे अवमूल्यन आणि कच्च्या तेलातील दरवाढीची जोड मिळाली आहे.
संजीव झारबडे, उपाध्यक्ष, कोटक सिक्युरिटीज

Story img Loader