आठवडय़ाची सुरुवात करताना संमिश्र हालचाल नोंदविणारा भांडवली बाजार मंगळवारी सावधपणे स्थिरावताना दिसला. सुरुवातीच्या घसरणीनंतर सेन्सेक्स दिवसअखेर ६१.५७ अंश वाढीसह १९,८०४.०३ वर पोहोचला, तर कालच्या व्यवहारात किरकोळ घसरण नोंदविणारा राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी नाममात्र ९.६५ अंश वधारणेसह ५,८५०.२० वर स्थिरावला. आशियाई बाजारांचा कल पाहता, आज आपल्या बाजारानेही नरमाईनेच प्रवास सुरू केला. जगभरातील सर्वच भांडवली बाजारातील गुंतवणूकदारांची नजर अमेरिकेच्या फेडरल रिझव्‍‌र्हकडे असल्याने बाजारात आज फारसा उत्साह नव्हता.
रुपयाच्या तुलनेत डॉलर भक्कम होताना बाजारातील माहिती तंत्रज्ञान निर्देशांकाची (+२.०५%) आगेकूच सुरू होती. रुपया ६३ पर्यंत घसरल्यानंतर टीसीएस, इन्फोसिस, विप्रो यांचे समभाग मूल्य वधारले. कालच्या व्यवहारात ३० टक्क्यांपर्यंत आपटलेला रॅनबॅक्सीचा समभागही आज काहीसा सावरला. हिंदुस्थान युनिलिव्हर, टाटा मोटर्स, सेसा गोवा, आयटीसी हे वधारणाऱ्या समभागांच्या यादीत होते.
डॉलरच्या तुलनेत रुपया ५४ पैशांनी कमकुवत बनत मंगळवारअखेर ६३.३७ पर्यंत घसरला. व्यवहारातील त्याची ०.८५ टक्क्यांची घसरण ही गेल्या पंधरवडय़ातील सर्वात मोठी ठरली. सोमवारी सलग दुसऱ्या सत्रात तेजी नोंदविताना रुपया प्रति डॉलर ६२.८३ अशा गेल्या महिन्याभरातील वरच्या पातळीवर तो या वेळी होता. रोखे खरेदी संथ करण्यासाठी आजपासून (भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री उशिरापासून) सुरू झालेल्या अमेरिकन फेडरल रिझव्‍‌र्हच्या बैठकीकडे डोळा असलेल्या चिंतातूर गुंतवणूकदारांमध्ये डॉलरचे पारडे जड झाल्याने रुपया पुन्हा नरमला.

Story img Loader