यश पैशाने मोजणे बंद केल्यावरच अपयशाची भावना निर्माण होणे थांबेल, असे मत पी. गोपीचंद यांनी लहान मुलांना अपयशाचा सामना करण्यासाठी समाजाने विशेष करून पालकांनी काय करायला हवे हे सांगताना मांडले.
‘सर्फ एक्सेल’च्या वतीने ‘हार को हराओ’ ही सामाजिक मोहिम हाती घेण्यात आली आहे. ‘डाग अच्छे है’ या घोषवाक्याला धरुनच ‘हार को हराओ’ ही मोहीम राबविण्यात येणार आहे. शिक्षणक्षेत्रात वाढत्या स्पर्धेमुळे पाल्यांमध्ये निर्माण होणारी अपयशाची भिती घालविण्याकरिता पालकांनी कोणत्या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे, यावर ही मोहीम आधारित असेल. गुरुवारी मुंबईत या मोहिमेच्या उद्घाटनाप्रसंगी एका चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी गोपीचंद बोलत होते. ‘ध्येयापर्यंतच्या प्रवासाचा मार्ग मजेशीर असतो. त्याकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहावे. मुलांनीही याच दृष्टीकोनातून ध्येय्यप्राप्तीकडील प्रवास करावा, यादृष्टीने त्यांची जडणघडण करावी,’ असे गोपीचंद पुढे म्हणाले.
यात अभिनेत्री व स्तंभलेखिका ट्विंकल खन्ना, क्रिकेट संघाचे माजी कप्तान सौरव गांगुली, पोद्दार शाळेच्या प्राचार्या प्रिती कुमार, हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडच्या होम केअर विभागाच्या कार्यकारी संचालिका प्रिया नायर आणि बाल मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हरिश शेट्टी या चर्चासत्रात सहभागी झाले होते. यश कसे पचवावे याचे मार्गदर्शन पालकांनी केल्यास पाल्यांना पुढेमागे आलेले अपयश झेलणेही सापे जाईल, असे मत ट्विंकल खन्ना यांनी मांडले. तसेच पालकांनी निर्माण केलेले भितीदायक वातावरण मुलांना अपयशाकडे नेते, असे त्यांनी परखडपणे सांगितले.
चांगल्या विचारांबरोबरच पालक आणि पाल्यांमध्ये वाईट गोष्टींचीही, विचारांचीही देवाण-घेवाण होणे गरजेचे आहे. त्यासाठी मुलांवर विश्वास ठेवणे आवश्यक असल्याचे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हरिश शेट्टी यांनी सांगितले. तर अपयशाकडे शिकवण म्हणून पाहण्याची दृष्टी समाजामध्ये विकसित होण्याची गरज आहे, असे मत सौरव गांगुली यांनी मांडले.