आतापर्यंत केवळ व्यवहारातच २५ हजाराला स्पर्श करणारा सेन्सेक्सने गुरुवारी बंद होताना प्रथमच हा ऐतिहासिक टप्पा पार करून विश्राम घेतला. सेन्सेक्सने हे नवे उच्चांक शिखर सर केले असताना निफ्टीनेही नव्या उच्चांकापल्याड मजल गाठली. २१३.६८ अंशांच्या (०.८६%) वाढीसह सेन्सेक्स २५,०१९.५१ वर, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ७१.८५ अंश (०.९७%) वाढीसह ७४७४.८५ या सर्वोच्च स्तरावर पोहोचला.
सेन्सेक्स आतापर्यंत तीन वेळा व्यवहारात २५ हजाराच्या पुढे जाऊन आला आहे. भाजपप्रणीत लोकशाही आघाडीला बहुमत मिळाल्यानंतर सेन्सेक्स १६ मे रोजी २५,३७५.६३ या सर्वोच्च टप्प्यावर पोहोचला होता. तर आठवडय़ानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रिमंडळाच्या शपथविधी दिनी, २६ मे रोजी सेन्सेक्स पुन्हा २५,१७५.२२ पर्यंत गेला होता.
बुधवारीही सेन्सेक्स व्यवहारात २५ हजारांच्या वर जाऊन आला होता, तर निफ्टीने मंगळवारी ७४१५.८५ पर्यंत झेप घेतली होती. दोन्ही निर्देशांकांमध्ये बुधवारच्या सत्रअखेर किरकोळ घसरण नोंदवली होती.
गुरुवारी सुरुवातीच्या व्यवहारातच सेन्सेक्स २५ हजारांपुढे गेला. पोलाद, ऊर्जा, तेल व वायू क्षेत्रातील समभागांच्या जोरदार खरेदीमुळे मुंबई निर्देशांक सत्रात २५,०४४.०६ पर्यंत झेपावला.
मुंबई शेअर बाजारातील १२ पैकी केवळ एकच निर्देशांक घसरला. इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये ०.१७ ते ३.३३ टक्के वाढ नोंदली गेली. यामध्ये पोलाद, तेल व वायू, ऊर्जा, माहिती तंत्रज्ञान, भांडवली वस्तू यांचा समावेश राहिला.
सेन्सेक्समधील रिलायन्स, इन्फोसिस, टाटा मोटर्स, सेसा स्टरलाईट, ओएनजीसी, हिंदुस्थान युनिलिव्हर, आयटीसी, टाटा स्टील, हिंदाल्को यांचे समभाग मू्ल्य उंचावले. सेन्सेक्समधील २३ कंपनी समभाग वधारले. स्मॉल व मिड कॅप निर्देशांक वर्षभराच्या उच्चांकाला पोहोचले.
११ महिन्यांत मेमध्ये प्रथमच देशाच्या सेवा क्षेत्राचा विस्तार वाढल्याने बाजारात गुंतवणूकदारांमध्ये उत्साह संचारला आहे. त्यातच केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी येत्या महिन्यातील अर्थसंकल्पाच्या पाश्र्वभूमीवर बैठकांचा सपाटा सुरू केल्याने अर्थव्यवस्था सुधारण्याच्या आशेनेही विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांचा भांडवली बाजारातील ओघ विस्तारू लागला आहे.
३०,००० शी गाठ अर्थसंकल्पपूर्वीच!
नरेंद्र मोदी सरकारचा पहिला अर्थसंकल्प येईपर्यंतच सेन्सेक्स ३० हजाराचा पल्ला गाठेल, असा आशावाद ‘मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सव्‍‌र्हिसेस’ या दलाल पेढीचे अध्यक्ष मोतीलाल ओस्ीवाल यांनी व्यक्त केला आहे. काल ‘कार्वी स्टॉक ब्रोकिंग’ने प्रसिद्ध केलेल्या अहवालात सेन्सेक्स २०२० पर्यंत १,००,००० पर्यंत जाईल, असे म्हटले आहे. वार्षिक २६ टक्के दराने मुंबई निर्देशांक वाढ नोंदवेल, असा काव्‍‌र्हीचा कयास आहे. ‘अ‍ॅम्बिट’ने मार्च २०१५ पर्यंत सेन्सेक्सचा अंदाज ३०,००० वर्तविला आहे. ‘डॉएशे बँके’ने सेन्सेक्स डिसेंबर २०१४ पर्यंत २८,००० होईल, असे म्हटले आहे. तर ‘नोमुरा’च्या अंदाज २७,२०० चा आहे. ‘बँक ऑफ अमेरिका मेरिल लिंच’चाही २७,००० चा कयास आहे.