जागतिक भांडवली बाजाराची चिंता वाहतानाच गुंतवणूकदारांनी नफेखोरीचा मार्ग अनुसरल्याने सेन्सेक्सने मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी त्रिशतकी आपटी नोंदविली. यातून हा निर्देशांक आता २८ हजाराखाली उतरला आहे, तर निफ्टीमध्येही शतकी घसरण नोंदली गेल्याने राष्ट्रीय शेअर बाजाराच्या या प्रमुख निर्देशांकाने ८,४०० चा स्तर सोडला.
मंगळवारचे व्यवहार संपले तेव्हा ३२२.३९ अंश घसरणीसह सेन्सेक्स २७,७९७.०१ वर तर निफ्टी ९७.५५ अंश घसरणीमुळे ८,३४०.७० पर्यंत खाली आला.
भांडवली बाजारातील गेल्या दोन महिन्यांतील ही तिसरी मोठी घसरण होती. सोमवारी सेन्सेक्सने नव्या सप्ताहाची सुरुवातही ३०० हून अधिक व निफ्टीची १०० अंशांच्या आपटीने केली होती. मंगळवारीही बाजार २८,१३४.२२ या फारशा आशादायक नसलेल्या स्तरावर सुरू झाला होता.
भांडवली बाजारात मंगळवारी ऊर्जा, पोलाद, भांडवली वस्तू, ग्राहकोपयोगी वस्तू, तेल व वायू, बँक, वाहन असे अधिकतर क्षेत्रीय निर्देशांक घसरले होते. युरोपबरोबरच चीनसारख्या देशात अर्थसंकट गहिरे होत असतानाच भारतातही चालू खात्यावरील तुटीच्या वाढीची भीती व्यक्त केली गेली.
चालू आर्थिक वर्षांच्या दुसऱ्या तिमाहीत तूट १०.१ अब्ज डॉलर राहिली आहे. वाढत्या सोने आयातीमुळे ही तूट सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या १.२ टक्क्यांपर्यंत विस्तारली आहे.
आठवडय़ातील दुसऱ्या सत्रात सेन्सेक्स २८ हजारावर २८,१५७.५३ पर्यंतच जाऊ शकला. तर सततच्या नफेखोरीने याच व्यवहारात त्याचा २८ हजार हा टप्पाही मागे पडला. सत्रात २७,७९७.०१ या तळापर्यंत येताना त्याने महिन्याचा नीचांक नोंदविला. यामुळे तिन्ही दिवसांतील त्याची आपटी एकूण ७६५.८१ अंशांची राहिली आहे.
सेन्सेक्समधील ३० पैकी केवळ चारच समभागांचे मूल्य वधारले. त्यात औषध निर्मिती क्षेत्रातील दोन कंपन्या होत्या. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये ऊर्जा निर्देशांक सर्वाधिक, २.७५ टक्क्यांनी घसरला. स्मॉल व मिड कॅपही अनुक्रमे १.५९ व १.५७ टक्क्यांनी घसरले.
चीनमधील अर्थसंकटाने तेथील प्रमुख निर्देशांकांवरही विक्रीचा दबाव निर्माण झाला आहे. तर बिकट अर्थस्थितीपोटी युरोपमध्ये आर्थिक सहकार्य जारी करण्याच्या शक्यतेने तेथील आघाडीचे निर्देशांकही तळातच प्रवास करत आहेत.
१२ दिवसांत १२ टक्के नुकसान!
मुंबई: भांडवली बाजारात व्यवहार करणाऱ्यांना राकेश झुनझुनवाला हे नाव फायद्याची गुंतवणूक करणारे म्हणून माहित आहे. मात्र या बडय़ा असामीलाही गेल्या १२ दिवसात १२ टक्क्य़ांचे नुकसान सोसावे लागले आहे. झुनझुनवाला यांनी आपल्या रेअर एंटरप्राईजेस या कंपनीमार्फत स्पाईसजेट या खासगी हवाई कंपनीत २८ नोव्हेंबरला १३.४ कोटी रुपयांची गुंतवणूक केली. प्रति समभाग १७.८८ रुपयांनी त्यांनी कंपनीचे ७५ लाख समभाग खरेदी केले. गेल्या आठवडय़ात नागरी हवाई महासंचालनालयामार्फत र्निबध आल्यानंतर आणि दिवसाला ८० उड्डाणे रद्द केल्यानंतर कंपनीचा समभाग गेल्या १२ दिवसात सडकून आपटला आहे. मंगळवारी समभाग मूल्य २.६२ टक्क्य़ांनी उंचावले असले तरी त्याचा भाव आता १५.६५ रुपयांवर आला आहे. यामुळे कंपनीत १.४ टक्के हिस्सा राखणाऱ्या झुनझुनवाला यांना अल्पावधीत १२ टक्क्य़ांचे नुकसान झाले आहे.
रॅनबॅक्सी लॅब,  सन फार्मा उंचावले
मुंबई: कंपन्यांच्या विलीनीकरणाला भारतीय स्पर्धा आयोगाने हिरवा कंदील दाखविल्यानंतर रॅनबॅक्सी लॅब व सन फार्माचे समभाग सत्रात ४.३ टक्क्य़ांपर्यंत उंचावले. सलग दुसऱ्या दिवशीही तब्बल ३०० अंशांहून अधिक आपटलेल्या सेन्सेक्समध्ये वधारलेल्या चार समभागांमध्येही याच दोन कंपनी समभागांचा समावेश होता. दिवसअखेर रॅनबॅक्सीला ६४७ रुपये, तर सन फार्माला ८४०.९० रुपयांचा भाव मिळाला. रॅनबॅक्सी लॅब व सन फार्माच्या चार अब्ज डॉलरच्या विलीनीकरण व्यवहाराला आयोगाने सोमवारी मंजुरी दिली. औषधांबाबतच्या काही किरकोळ अटी लादत आयोगाने गेल्या अनेक दिवसांपासूनचा हा प्रस्ताव मान्य केला. या दोन कंपन्यांच्या विलीनीकरणाची घोषणा एप्रिलमध्ये करण्यात आली होती. या विलीनीकरणाने जगातील पाचवी मोठी औषध उत्पादक कंपनी अस्तित्वात आली आहे.

Story img Loader