आठवडय़ातील दुसऱ्या सत्रात निर्देशांकांमध्ये किरकोळ वाढ राखत प्रमुख शेअर बाजारांनी नवा उच्चांक स्थापन केला. ३.४८ अंश वधारणेसह सेन्सेक्स २५,५८३.६९ पर्यंत तर निफ्टी १.८० अंश वाढीसह ७,६५६.४० वर बंद झाला.
व्यवहारात सेन्सेक्स २५,७११.११ तर निफ्टी ७,६८३.२० पर्यंत गेले होते. सेन्सेक्समध्ये या चार व्यवहारात जवळपास ७८० अंशांची भर पडली आहे. असे करताना सलग तिसऱ्या दिवशी मुंबई निर्देशांकाने ऐतिहासिक टप्पा गाठण्याचा क्रम राखला आहे.
मंगळवारी शेअर बाजारात माहिती व तंत्रज्ञान तसेच औषधनिर्मिती कंपन्यांचे समभाग उंचावले. तर बांधकाम निर्देशांक सर्वाधिक ३ टक्क्यांनी घसरला. सेन्सेक्समधील निम्म्याहून अधिक समभाग घसरले. किरकोळ महागाई व औद्योगिक उत्पादनाची आकडेवारी जाहीर होण्यास काही कालावधी शिल्लक असतानाच कमी मान्सूनच्या भीतीने बाजाराने व्यवहारातील २५,३४७.३३ हा नीचांक नोंदविला.
रुपयात सलग घसरण
डॉलरच्या तुलनेत रुपया मंगळवारी पुन्हा घसरला. डॉलरच्या तुलनेत स्थानिक चलन ९ पैशांनी रोडावत ५९.२९ पर्यंत खाली आले. व्यवहारात सुरुवातीलाच ५८.९८ या दिवसाच्या उच्चांकावर असणारा रुपया अखेरच्या टप्प्यात ५९.२३ पर्यंत घसरला. आधीच्या दोन सत्रांत रुपया २१ पैशांनी भक्कम बनला होता. दरम्यान, मुंबईच्या सराफा बाजारात मंगळवारी संमिश्र वातावरण पाहायला मिळाले. स्टॅण्डर्ड सोने १० ग्रॅममागे ४० रुपयांनी वधारले. तर चांदीचा किलोचा भाव मात्र २५ रुपयांनी खाली आला. मौल्यवान धातूचे दर अनुक्रमे २६,७०० व ४१,०८५ रुपये राहिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा