भांडवली बाजाराने घसरणीचा कित्ता मंगळवारी पुन्हा एकदा गिरविला. सेन्सेक्सने २८ हजार तर निफ्टीने ८,५०० खालील प्रवासाची सुरुवात सप्ताहारंभाने केल्यानंतर आठवडय़ाच्या दुसऱ्या व्यवहारातील सत्रात प्रमुख निर्देशांकांमध्ये किरकोळ घसरण नोंदली गेली.
तेजीसह व्यवहाराची सुरुवात करणाऱ्या बाजारात मूडीजद्वारे कमी अंदाजित केलेल्या भारताच्या विकास दराबाबत नाराजी व्यक्त झाली. परिणामी, ४६.७३ अंश घसरणीसह सेन्सेक्स २७,८३१.५४ वर तर १०.७५ अंश नुकसानासह निफ्टी ८,४६६.५५ पर्यंत आला.
एकूण सेन्सेक्स घसरणीमुळे गेले दोन दिवस भाव कमाविणारे बँक समभाग मंगळवारी मात्र घसरले. त्याचबरोबर मुंबई निर्देशांकातील एचडीएफसी, ल्युपिन, सन फार्मा आदी आघाडीचे समभागही घसरले. सुरुवातीच्या तेजीमुळे व्यवहारात सेन्सेक्सने २८ हजारांचा पल्ला गाठला होता. मात्र नंतर त्यात घसरण येऊन दिवसअखेरही निर्देशांक सोमवारच्या तुलनेत नकारात्मक स्थितीत कायम राहिला.  सेन्सेक्समधील २२ समभागांचे मूल्य घसरले. गेल, कोल इंडिया, सिप्ला, टाटा स्टील, मारुती, इन्फोसिसला कमी मागणी राहिली.