वधारत्या व्याजदरांवर चिंता व्यक्त करत भांडवली बाजारात गेल्या दोन दिवसांत नोंदविली गेलेली घसरण मंगळवारी किरकोळ अंश वाढीने रोखली गेली. दिवसभरात २० हजारांवर पोहोचलेला मुंबई निर्देशांक दिवसअखेर कालच्या तुलनेत अवघ्या १९.२५ अंश वाढीसह १९,९२०.२१ वर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजारातही वाढ नोंदली जात असताना निफ्टी २.७० अंश वधारणेसह ५,८९२.४५ वर स्थिरावला. रिझव्र्ह बँकेने रेपो दरात पाव टक्का वाढ केल्यानंतर ऐन सण-समारंभात गृह, वाहन कर्ज महाग होण्याच्या धास्तीने गुंतवणूकादारांनी गेल्या दोन व्यवहारांत सेन्सेक्सला ७४६ अंश घसरण नोंदविण्यास भाग पाडले. बाजाराची आजची सुरुवातही १९,९०१ अशी नरमाईने झाली. सकाळच्या व्यवहारातच २० हजाराला स्पर्श केल्यानंतर दुपापर्यंत १९,७८३ असा दिवसाचा नीचांक त्याने गाठला. बाजारात आजही बँक समभागांवरील दबाव जाणवला. ‘मूडीज’द्वारे मानांकन कमी झाल्याने स्टेट बँकेचा समभाग ०.३३ टक्क्यांनी घसरला, तर क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये वाहन आघाडीवर होता. सेन्सेक्समधील १४ कंपनी समभागांचे मूल्य वधारले.
रुपयातील घसरण कायम
डॉलरच्या तुलनेत सलग तिसऱ्या दिवशी रुपयातील घसरण कायम राहिली. भारतीय चलन १५ पैशांनी रोडावत ६२.७५ वर येऊन ठेपले. गेल्या तीनही सत्रातील रुपयातील घसरण ९८ पैशांची झाली आहे. तत्पूर्वी गेल्या गुरुवारी रुपया एकाच व्यवहारात १६१ पैशांनी भक्कम होत ६१.७७ पर्यंत उंचावला होता. चलनातील आजची घसरण ही महिनाअखेर (प्रामुख्याने तेल आयातदारांकडून) अमेरिकन चलनाची मागणी वाढल्याने नोंदविली गेली. मंगळवारी दिवसभरात रुपयाचा प्रवास ६२.४५ ते ६२.८९ असा घसरता राहिला.
सराफात संमिश्र हालचाल
अनोख्या टप्प्यापासून घसरलेले सराफा बाजारातील दर मंगळवारी संमिश्र हालचाल करते झाले. तोळ्यासाठी सोने धातूचा दर ३० रुपयांनी वधारला. स्टॅण्डर्ड प्रकारच्या सोन्याचा भाव मंगळवारी वधारून २९,८२० रुपयांवर जात पुन्हा ३० हजारांकडे कूच करता झाला, तर चांदीच्या भावांमध्ये मात्र घसरण आली. किलोच्या चांदीचा दर ५० रुपयांनी कमी होत ५० हजारांपासून आणखी लांबवर गेला. दिवसअखेर तो ४९,७१५ रुपयांवर स्थिरावला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा