भांडवली बाजारातील घसरण सलग आठव्या दिवशीही कायम राहिली आहे. सप्ताहाच्या अखेरच्या दिवशी सेन्सेक्स १५३.१७ अंशांनी खाली येताना १९ हजारासमीप येऊन ठेपला आहे. बाजार आता १९,१६४.०२ वर आहे. निफ्टीत शुक्रवारी ४९.९५ अंश घसरणीसह ५,६७७.९० वर स्थिरावला आहे.
गेल्या आठवडय़ाभरात मुंबई निर्देशांक ३ टक्क्यांनी खाली आला आहे. तर गेल्या सात दिवसांतील त्यातील घसरण ही ९८६ अंशांची राहिली आहे. बाजारात शुक्रवारी डॉलरच्या तुलनेत ६१ पर्यंत घसरणाऱ्या रुपयाचा दबाव दिसून आला. चलनाने व्यवहारात ६१ असा तळ पुन्हा एकदा गाठला.
भक्कम अशा डॉलरमुळे विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी भांडवली बाजारातून निधी काढून घेणे कायम ठेवले आहे. त्यातच गोल्डमॅन सॅचने समभागांचे मूल्यांकन घटविल्यानेही बाजारात विस्तारित नकारात्मक वातावरण राहिले आहे. बँकांच्या वाढत्या थकित कर्जाबाबत बँक ऑफ अमेरिका मेरिल लिंचने व्यक्त केलेल्या भीतीचेही पडसाद बाजारातील सप्ताहाअखेरच्या व्यवहारावर उमटले.जिंदाल स्टील अ‍ॅन्ड पॉवर, स्टरलाइट इंडस्ट्रिज या पोलाद क्षेत्रातील समभागांमध्ये घसरण झाली. फायनान्शिअल टेक्नॉलॉजिजच्या (२१.१२%) प्रवर्तक कंपनीसह एमसीएक्स (२०%) या उपकंपनीचा समभाग आजही घसरता राहिला. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये बांधकाम निर्देशांक घसरणीच्या वरच्या टप्प्यावर होता. सेन्सेक्समधील तब्बल २४ समभागांचे मूल्य कमी झाले.

Story img Loader