जागतिक भांडवली बाजारातील नरमाई आणि मालवाहतुकीत दरवाढ सुचविणारा रेल्वे अर्थसंकल्प या प्रतिकूलता मंगळवारी भांडवली बाजाराची गाडी रुळावरून घसरविणाऱ्या ठरल्या. या जबर घसरणीने गुंतवणूकदारांची मालमत्ता तब्बल एक लाख कोटी रुपयांनी रोडावली. तर प्रमुख निर्देशांक ‘सेन्सेक्स’ने जेमतेम १९ हजाराची पातळी राखून धरली असली तरी तो तीन महिन्यांच्या नीचांकावर आला आहे. शेअर बाजारात सेन्सेक्सने चालू महिन्यात दुसऱ्यांदा त्रिशतकी घसरण नोंदविली आहे. तर ‘निफ्टी’ही ५,८००च्या पातळीखाली आला आहे.
‘सेन्सेक्स’ ३१६.५५ अंश घसरणीसह १९,०१५.१४ वर तर ‘निफ्टी’ ९३.४० अंश नुकसानासह ५,७६१.३५ पर्यंत खाली आला आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांकही तीन महिन्याच्या तळाला आला आहे. मुंबई निर्देशांक २७ नोव्हेंबर २०१२ नंतर प्रथमच १९ हजारापासून लांब गेला आहे. त्यावेळी ‘सेन्सेक्स’ १८८४२.०८ वर होता. तर शेअर बाजाराचा आजचा प्रवास सत्रा दरम्यान १८,९७६.९४ पर्यंत खालावला होता.
‘सेन्सेक्स’मधील २५ समभाग घसरणीत नोंदले गेले. रिलायन्स, एचडीएफसी, टाटा मोटर्स, ओएनजीसी, महिंद्र अॅन्ड महिंद्र, बजाज ऑटो, कोल इंडिया अशा साऱ्या आघाडय़ांच्या कंपन्यांचे समभाग मूल्य ३ ते ४ टक्क्यांपर्यंत कमी झाले होते. मिड आणि स्मॉल कॅपमधील आपटी दुसऱ्या दिवशीही कायम राहिली. दोन्ही निर्देशांक अनुक्रमे १.७६ व २.४३ टक्क्यांनी घसरले होते. एकूणच भांडवली बाजारात गुंतवणूकदारांची मालमत्ता १.०७ लाख कोटी रुपयांनी कमी होऊन ६६१.४ लाख कोटी रुपयांवर आली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा