सलग पाचव्या दिवशी वधारताना सेन्सेक्स सप्ताहारंभीच गेल्या पंधरवडय़ाच्या उच्चांकाला पोहोचला. आघाडीच्या कंपन्यांच्या वधारत्या तिमाही वित्तीय निष्कर्षांने आनंदी झालेल्या गुंतवणूकदारांनी मुंबई निर्देशांकाला ७३.६१ अंश भर नोंदविण्यास भाग पाडले. यामुळे मुंबई शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक २५,७१५.१७ वर गेला आहे. तर २०.३० अंश वधारणेसह राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ७,६८४.२० पर्यंत पोहोचला.
नव्या सप्ताहाची सुरुवात करताना सेन्सेक्स २५,७७६.५४ या वधारत्या टप्प्यावरच सुरू झाला. सत्रात तो थेट २५,८६१.१५ पर्यंत झेपावला. रिलायन्स, एचडीएफसीसारख्या सेन्सेक्समधील कंपन्यांच्या जून अखेर संपलेल्या आकर्षक तिमाही निकालांचे बाजाराने स्वागत केले. जागतिक शेअर बाजार आणि मान्सून पूर्वपदावर येण्याचे संकेतही तेजीला साथ देणारे ठरले.
एचडीएफसीचा समभाग ३ टक्क्यांनी तर रिलायन्सचा २ टक्क्यांनी वधारला. २१ टक्के नफा वाढ राखूनही एचडीएफसी बँकेच्या समभागाला बाजारात मात्र तेजीची कामगिरी नोंदविता आली नाही. बाजाराने यापूर्वी इन्फोसिस, टीसीएसच्या निकालांनाही वधारणीची साथ दिली होती. सेन्सेक्समधील १३ कंपनी समभागांना मागणी राहिली. तर निफ्टीच्या दफ्तरी २४ समभाग या यादीत होते.
सेन्सेक्समधील आयटीसी, अॅक्सिस बँक हे समभाग वधारले. तर टाटा पॉवर, गेल, स्टेट बँक, भेल, स्टरलाइट, इन्फोसिस, लार्सन अॅण्ड टुब्रो, ओएनजीसी यांच्या समभागांचे मूल्य रोडावले. मिड कॅप व स्मॉल कॅपही अनुक्रमे ०.५१ व ०.८७ टक्के वधारले.
सेन्सेक्सचा यापूर्वीचा सवरेत्कृष्ट बंद ७ जुलै रोजी नोंदला गेला होता. या वेळी मुंबई निर्देशांकाने २६,१०० टप्पा पार केला होता. तर सलग पाच व्यवहारातील शेअर बाजाराची भर ७०० हून अधिक अंशांची राहिली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा