बांधकाम, माहिती-तंत्रज्ञान, बँकिंग क्षेत्रातील कंपन्यांनी घसघशीत कमाई करीत गुरुवारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ‘सेन्सेक्स’ची गुढी १२७.७५ अंशांनी उंचावत नेली. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या ‘निफ्टी’ने ३५.३० अंशांची कमाई केली, मात्र दिवसअखेर ५६०० अंशांच्या अडथळा ओलांडून विश्राम घेण्यात त्याला यश येऊ शकले नाही.
आज शेअर बाजारात झालेल्या व्यवहारात बांधकाम (२.२१%), माहिती-तंत्रज्ञान (२.०४%) आणि बँकेक्स (१.५३%) अशा विभागीय निर्देशांकांच्या कामगिरीच्या जोरावर सेन्सेक्सला शतकी कमाईची कामगिरी करता आली. टाटा मोटर्स (३.९२%), इन्फोसिस (३.७२%), आयसीआयसीआय बँक (३.५२%) या आघाडीच्या समभागांमधील मोठय़ा भाव हालचालीचे सेन्सेक्सच्या दौडीत प्रमुख योगदान राहिले. त्या उलट तेल व नैसर्गिक वायू, धातू आणि ऊर्जा या निर्देशांक मात्र गुरुवारच्या व्यवहारात खाली राहिले. भारती एअरटेल (-२.३१%), टाटा स्टील (-२.२४%) आणि एचडीएफसी (-१.९०%) हे समभाग घसरणीत आघाडीवर राहिले. एशियन डेव्हलपमेंट बँकेने आपल्या अहवालात भारताची अर्थव्यवस्था लवकरच मार्गावर येईल, असा सूर लावल्यामुळे त्याविषयी धास्ती एकीकडे ओसरली तर इन्फोसिस उद्या (शुक्रवारी) आपले वार्षिक निकाल जाहीर करताना विक्रीत १२-१५% वाढ दर्शवेल, याबद्दल सकारात्मकतेने बाजारात आज खरेदीसाठी उत्साह दिसून आला. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेली इन्फोसिसमधील खरेदीने आज चांगलाच जोर पकडलेला दिसला. इन्फोसिसच्या निकालापाठोपाठ येत असलेले औद्योगिक उत्पादन विकासदराचे आणि ग्राहक किंमत निर्देशांक आकडे सकारात्मक राहिल्यास बाजारात वाढीचा क्रम आणखी काही दिवस सुरू राहण्याचा कयास विश्लेषक व्यक्त करीत आहेत. घसरलेल्या समभागांवर वधारलेल्या समभागांचे मात करणारे प्रमाण पाहता बाजारात सध्या तरी तेजीवाल्यांची सरशी असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.
*  त्रिवेणी इंजिनीयरिंग, स्टर्लिग बायोटेक, खेतान इलेक्ट्रिकल्स आणि उत्तम शुगर मिल्स वगैरे ‘बीएसई’वर सूचिबद्ध १०४ समभाग शुक्रवारपासून सीमित व्यवहार होणाऱ्या ‘टी’ वायदा गटात टाकण्यात येतील. गुंतवणूकदारांच्या सुरक्षिततेसाठी या समभागांमध्ये सट्टेबाज व्यवहार टाळण्यासाठी बीएसईने हे पाऊल टाकले आहे.

Story img Loader