गेल्या चार सत्रातील घसरण भांडवली बाजाराने रोखून धरत सेन्सेक्स तेजीसह नोंदला गेला खरा; मात्र २० हजारच्या वर तो पोहोचू शकला नाही. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्ये १६.५० अंश वाढ होत तो ५,९८३.५५ वर पोहोचला. सोमवारपासूनच्या सततच्या आपटीमुळे मुंबई निर्देशांकाने पाच व्यवहारांतर्गत ५८० अंश घसरला आहे. शुक्रवारी त्यात किरकोळ ३० अंशांची वाढ होऊन तो १९,७०४ वर बंद झाला. गुरुवारच्या सत्रात एकदम ३९० अंशांची (३%) आपटी खात २० हजारांच्या खाली येऊन ठेपलेला सेन्सेक्स गेल्या दोन आठवडय़ाच्या नीचांकावर बंद झाला होता. आजच्या व्यवहारातही मुंबई निर्देशांक मध्यंतरात नरम होत १९,५७२ या दिवसाच्या नीचांकावर येऊन ठेपला होता. मात्र टाटा स्टील, टाटा पॉवर्स, लार्सन अ‍ॅन्ड टुब्रो, आयसीआयसीआय बँकसारख्या निवडक आघाडीच्या समभाग खरेदीमुळे बाजारात सप्ताहअखेर किरकोळ तेजी नोंदली गेली. सेन्सेक्समधील निम्मे समभाग तेजीत तर तेवढेच घसरणीत होते. दरम्यान, रुपयातील घसरण सलग सहाव्या दिवशीही कायम राहिल्याने भारतीय चलनाने सहा महिन्यातील नवा नीचांक डॉलरच्या तुलनेत ५५.६३ जवळ गाठला. कालच्या तुलनेत त्यात ४ पैशांची आणखी घट झाली.