जुलैमधील घाऊक महागाई दराने सलग सातव्या महिन्यात उणे स्थितीतील प्रवास नोंदविल्याच्या जोरावर उंचावलेल्या व्याजदर कपातीच्या आशेचे स्फुरण चढलेल्या गुंतवणूकदारांनी भांडवली बाजारात सप्ताहअखेरच्या व्यवहारात अधिक खरेदीचा सपाटा लावला. परिणामी मुंबईसह राष्ट्रीय शेअर बाजाराच्या प्रमुख निर्देशांकाने गेल्या सात महिन्यांतील सर्वोत्तम निर्देशांक उसळी शुक्रवारच्या एकाच सत्रात नोंदविली. यामुळे सेन्सेक्सला २८ हजार, तर निफ्टीला ८५००चा पल्ला पार करणे विनासायास शक्य झाले.
५१७.७८ अंश वाढीसह सेन्सेक्स २८,०६७.३१ वर, तर १६२.७० अंश वाढीसह निफ्टी ८५१८.५५ वर बंद झाला. प्रमुख निर्देशांकाची ही एकाच सत्रातील जानेवारी २०१५ नंतरची सर्वात मोठी झेप ठरली. त्यातही सेन्सेक्स २० जानेवारीनंतर, तर निफ्टी १५ जानेवारीनंतर प्रथमच या स्तरावर उंचावला. सप्ताहअखेरच्या व्यवहारात निफ्टी ८५३०.१० तर सेन्सेक्स २८,१००.६४ पर्यंत झेपावला. गुरुवारच्या तुलनेत दोन्ही निर्देशांक जवळपास दोन टक्क्य़ांनी उंचावले.
संसदेतील वस्तू व सेवा कर तसेच भूसंपादन विधेयकाच्या रूपात आर्थिक सुधारणा रखडल्याच्या पाश्र्वभूमीवर तसेच डॉलरच्या तुलनेत रुपया ६५ पर्यंत तळात गेल्यावर भांडवली बाजारात गेल्या काही सलग सत्रांपासून घसरणीचे वातावरण होते. शुक्रवारी मात्र जुलैमधील उणे (-) ४.०५ टक्क्य़ांवर विसावलेल्या घाऊक महागाईच्या दराचे आकडे जाहीर होताच बाजारात चैतन्य पसरले. महागाई कमी होत असलेली पाहून आता व्याजदर कमी होतील या आशेवर बाजारात अधिकतर खरेदीचे व्यवहार झाले.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरांनी गेल्या साडेसहा महिन्यातील उतार अनुभवल्याची जोडही बाजाराच्या तेजीत इंधन घालणारी ठरली. व्याजदर कपातीच्या आशेने तसेच सरकारकडून सहाय्य होण्याच्या अंदाजाने बँक क्षेत्रातील समभागांमध्ये अधिक मूल्य चमक शुक्रवारच्या व्यवहारात दिसली. बँक समभागांसह वेदांता, रिलायन्स इंडस्ट्रीज, बजाज ऑटो, भारती एअरटेल हे सेन्सेक्समधील आघाडीचे समभाग तेजीत राहिले.
सेन्सेक्समधील केवळ दोन समभागवगळता इतर सर्व मूल्य वाढ नोंदविणारे ठरले. सार्वजनिक क्षेत्रातील स्टेट बँकेसह आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, अॅक्सिस बँक या खासगी बँकांचे समभाग मूल्यही वाढले. क्षेत्रीय निर्देशांकांमध्येही व्याजदर निगडित – स्थावर मालमत्ता, बँक, वाहन क्षेत्रातील समभागांना मागणी राहिली. मुंबई शेअर बाजारातील मिड व स्मॉल कॅप निर्देशांकही २ टक्क्य़ांपर्यंत वाढले.
दरकपात अपेक्षेने निर्देशांकांची सात महिन्यातील सर्वोत्तम उसळी
जुलैमधील घाऊक महागाई दराने सलग सातव्या महिन्यात उणे स्थितीतील प्रवास नोंदविल्याच्या जोरावर उंचावलेल्या व्याजदर कपातीच्या आशेचे स्फुरण
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 15-08-2015 at 05:18 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bse sensex gains 518 points to close at