पतधोरणात व्याजदर स्थिर ठेवण्याच्या रिझव्‍‌र्ह बँकेच्या निर्णयाचे भांडवली बाजाराने मंगळवारी स्वागत केले. शेवटच्या दीड तासात गुंतवणूकदारांनी समभागांची खरेदी केल्याने सेन्सेक्स १८४.८५ अंशांनी वधारून पुन्हा २६ हजारानजीक २५,९०८.०१ वर पोहोचला, तर निफ्टीतही ६२.९० अंश भर पडत हा निर्देशांक ७,७४६.५५ वर स्थिरावला.
सकाळी पतधोरण जाहीर होण्यापूर्वी भांडवली बाजार काहीसा नरम होता. सकाळी ११ च्या सुमारास ते सादर झाले तेव्हा सेन्सेक्समध्ये १० अंशांपर्यंतची घसरण होती. मात्र स्थिर व्याजदराबाबत स्पष्टीकरण होताच बाजारात थोडीफार खरेदी दिसू लागली. पतधोरणापश्चात गव्हर्नर राजन यांच्या आश्वासक विधानांनी खरेदीचा उत्साह वाढत गेला. दिवसअखेर निर्देशांकातील वाढ सोमवारच्या तुलनेत मोठय़ा फरकाची राहिली.
रिझव्‍‌र्ह बँकेच्या पतधोरणापूर्वी स्थिर व्याजदराच्या आशेपोटीच भांडवली बाजाराने सप्ताहारंभ तेजीसह नोंदविला होता. असे करताना सेन्सेक्स २५,५००च्या पुढे गेला होता. तर सलग दुसऱ्या दिवसातील तेजीमुळे तो आता २६ हजारानजीक येऊन ठेपला आहे. सलग दोन दिवसांतील मुंबई निर्देशांकाची भर ४२७.१७ अंशांची राहिली आहे.
 रिझव्‍‌र्ह बँकेने मंगळवारी अपेक्षेप्रमाणे व्याजदरात कोणताही बदल केला नाही. यामुळे व्याजदराशी संबंधित समभागांमध्ये मंगळवारी तेजी दिसून आली. महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र, टाटा मोटर्स, एचडीएफसी, बजाज ऑटो हे व्याजदराशी संबंधित वाहन उद्योगांचे समभाग जवळपास ४ टक्क्यांपर्यंत उंचावले. तर क्षेत्रीय निर्देशांकामध्ये मुसंडीत  बांधकाम निर्देशांकाने सर्वाधिक २.६ टक्क्यांसह आघाडी घेतली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा