वाणिज्य बँकांच्या रोकड सुलभतेबाबत रिझव्‍‌र्ह बँकेच्या सोमवारच्या निर्णयाचे व्यवहारात २० हजारांचा पल्ला गाठत स्वागत करणारा सेन्सेक्स दिवसअखेर मात्र किरकोळ अशा ८८.५१ अंशांनीच वधारला. मंगळवारच्या व्यवहारात बँक समभाग मात्र चमकून गेले. दिवसअखेर सेन्सेक्सला २० हजाराने पुन्हा हुलकावणी दिली आणि तो १९,९८३.६१ वर स्थिरावला. निफ्टीत २२.२५ अंश भर पडत तो ५,९२८.४० वर पोहोचला.
सेन्सेक्सने यापूर्वी २० सप्टेंबर रोजी २० हजाराला गाठले होते. रिझव्‍‌र्ह बँकेने ‘एमएसएफ’ हा बँकांचा आकस्मिक निधी उचलीचा पर्याय स्वस्त केल्याने (दर पाव टक्क्याने कमी केल्यानंतर) व्यवहारात बँक निर्देशांकासह एकूण सेन्सेक्सने उचल खाल्ली. २०,१५०.२७ उच्चांकाला स्पर्श केल्यानंतर दिवसअखेर बाजार या टप्प्यापासून खाली आला. दोन आठवडय़ांपूर्वी तो २०,२६३.७१ वर होता.
रिझव्‍‌र्ह बँकेच्या रोकड सुलभतेमुळे बँकांचे समभाग मंगळवारी वधारले. आयसीआयसीआय, फेडरल बँक या खासगी बँकांचे समभाग मूल्य २.२५ टक्क्यांपर्यंत वाढले, तर कॅनरा बँक, बँक ऑफ बडोदासारख्या सार्वजनिक बँकांच्या समभागाचे मूल्य एक टक्क्यांपर्यंत वाढले.

Story img Loader