विश्लेषकांच्या अपेक्षांवर खरी उतरलेली इन्फोसिसची तिमाही कामगिरी आणि मुख्य म्हणजे कंपनीने व्यक्त केलेल्या आगामी प्रवासाच्या उज्ज्वलतेवर स्वार होत भांडवली बाजार निर्देशांक- सेन्सेक्स सप्ताहअखेर २०,५२८.५९ च्या पुढे मार्गक्रमण करता झाला. शुक्रवारी वित्तीय निष्कर्ष जाहीर करणाऱ्या इन्फोसिससह माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अन्य कंपन्यांच्या समभागांच्या झालेल्या दमदार खरेदीच्या जोरावर मुंबई निर्देशांकाने भरीव २५५.६८ अंशांची भर घातली. सलग चौथ्या दिवशी बाजारातील या तेजीतून गुरुवारी ६ हजारपल्याड गेलेला निफ्टीही आज ७५.२५ अंशाने वधारत ६,०९६.२० पर्यंत जाऊन पोहोचला.
इन्फोसिसद्वारे शुक्रवारी यंदाच्या तिमाही निकाल हंगामाचा उत्तम शुभारंभ झाला. रुपयाच्या तुलनेत वधारत्या डॉलरच्या जोरावर कंपनीने आगामी महसूल प्रवास आधीच्या ६ ते १० टक्क्यांऐवजी थेट ९ ते १० टक्के राहील, असे संकेत दिले. याचा परिणाम अर्थातच इन्फोसिसच्या समभागात ४.७९ टक्क्यांपर्यंत उसळीबरोबरीनेच, संपूर्ण बाजारात उत्साह निर्माण करण्यास मदतकारक ठरला.
सेन्सेक्स गुरुवारच्या व्यवहारातच २० हजारापल्याड २०,२५० वर बंद झाला. शुक्रवारची सुरुवातच सेन्सेक्सने तेजीने करीत २०,५५९.६९ हा टप्पा गाठला. दिवसभरातील त्याचा उच्चांकही हाच राहिला. गेल्या तीन सत्रांत ३७८ अंश वाढ राखल्यानंतर शुक्रवारी सलग चौथ्या व्यवहारात त्याने सकारात्मक कामगिरी नोंदविली. निफ्टीही दिवसभरात ६,१०७.६० पर्यंत झेपावला.
मुंबई निर्देशांकाची यंदाच्या आठवडय़ातील ६१२ अंशांची भर ही ६ सप्टेंबरनंतरची सर्वात चांगली साप्ताहिक कामगिरी ठरली.
सेन्सेक्समधील ३० पैकी २० कंपनी समभाग तेजीत राहिले. आयसीआयसीआय बँक, लार्सन अॅण्ड टुब्रो, टाटा मोटर्स, मारुती सुझुकी यांच्या समभाग मूल्यात वाढ झाली. क्षेत्रीय निर्देशांकांमध्येही माहिती तंत्रज्ञानाचीच आगेकूच राहिली. व्याजदराशी निगडित बँक, भांडवली वस्तू निर्देशांकातील चमक सप्ताहाअखेरही कायम राहिली.
बांधकाम समभागांचे भाव इमले
‘गृहनिर्माण गुंतवणूक विश्वस्त संस्थां’ना भांडवली बाजारातील प्रवेश सुकर करण्याच्या सेबीच्या संकेतानंतर बांधकाम क्षेत्रातील समभाग शुक्रवारी उंचावले. त्यांच्यातील समभाग मूल्य झेप सप्ताहाअखेर ८%ची ठरली. युनिटेकचा समभाग ८.१%सह सर्वात आघाडीवर होता. तर प्रेस्टिज इस्टेट आणि डीएलएफ अनुक्रमे ३.३% व ३.२%नी वधारले. इंडियाबुल्स रिअल इस्टेट १.५५% तर ओबेरॉय रिअॅल्टी १.५३%नी वाढले. एकूण बांधकाम निर्देशांकातही २.६%ची भर पडली.
आयटी उद्योगाचा पथ उज्ज्वल!
ल्ल डॉलरमधील महसुलात ३.८ टक्क्यांच्या सरस वाढीच्या इन्फोसिसच्या शुक्रवारच्या निकालापूर्वी आयगेट या आणखी एका भारतीय सॉफ्टवेअर निर्यातदार कंपनीने ३.६ टक्केमहसुली वाढीची कामगिरी गुरुवारी जाहीर केली. भारतीय आयटी कंपन्यांसाठी महत्त्वाच्या असलेल्या अमेरिकेच्या बाजारपेठेची उभारी आणि तेथील ग्राहकसंख्येत भर याचे प्रत्यंतर या कामगिरीत उमटलेले दिसतात. रुपयाच्या तीव्र स्वरूपाच्या अवमूल्यनाने यात भर पडल्याने देशातील आयटी सेवा निर्यातदार कंपन्यांचा अन्य उद्योगक्षेत्रांच्या तुलनेत पदपथ उज्ज्वल राहील असे स्पष्ट संकेत आहेत. आगामी आठवडय़ात टीसीएसचे तिमाही निकाल येतील आणि या कंपनीचा डॉलरमधील ४ टक्क्यांपेक्षा अधिक वाढ दर्शविणारा असेल, असे विश्लेषकांचे कयास आहेत. किंबहुना याच अपेक्षेतून गेल्या तीन महिन्यांत टीसीएसच्या समभागाने अस्थिर बाजार स्थितीतही ३३% हून अधिक वाढ दाखविली आहे.