देशाचा विकासदर चालू आर्थिक वर्षांत ४ टक्क्यांच्या आसपासच राहण्याच्या अनेक वित्तसंस्थांच्या अंदाजाकडे दुर्लक्ष करत गुंतवणूकदारांनी नव्या सप्ताहारंभी भांडवली बाजाराला पंधरवडय़ाच्या उच्चांकावर नेऊन ठेवले. शेजारील चीनच्या विकास दरातील वाढीच्या जोरावर उंचावलेल्या आशियाई, युरोपीय बाजारांना साथ देत सेन्सेक्स सोमवारी २६६.४१ अंशवाढीसह १८,८८६.१३ पर्यंत पोहोचला, तर ७८.९५ अंश वधारणेसह निफ्टी ५,५५०.७५ वर गेला आहे.
भांडवली बाजाराने नव्या आठवडय़ाची सुरुवात तेजीसह केली. दिवसभरात ती कायम राहिली. गेल्या तीन सत्रांत ६५२ अंश वाढ नोंदविणाऱ्या सेन्सेक्सने सलग चौथ्या व्यवहारात वाढ राखली आहे. यामुळे मुंबई निर्देशांक त्याच्या १४ ऑगस्टच्या १९,३६७.५९ नजीक पोहोचला आहे.
भारताच्या सद्य अर्थप्रगतीबाबत विविध वित्तसंस्थांनी साशंकता व्यक्त केली असतानाच चीनच्या वाढत्या विकास दराचे गुंतवणूकदारांनी स्वागत केले. दिवसभरात सेन्सेक्स १९ हजाराला स्पर्श करताही झाला, तर निफ्टीने दिवसअखेर त्याचा ५,५०० चा अनपेक्षित टप्पाही पार केला. पेट्रोल पंप रात्री बंद ठेवण्यावरून उडालेल्या राजकीय धुराळ्याने मात्र इंधन कंपन्यांचे समभाग व्यवहारात चांगलेच अस्थिर बनले. चालू खात्यातील तूट नियंत्रणात आणण्याचा हा एक पर्याय अनेक तेल व वायू कंपनी समभागांना त्यांचे कमी-जास्त नोंदविण्यास भाग पडला.
सेन्सेक्समधील २३ समभागांचे मूल्य वधारले. रिलायन्स, आयटीसी, आयसीआयसीआय बँक, बजाज ऑटो, कोल इंडिया, एचडीएफसी, हिंदाल्को, मारुती, ओएनजीसी असे सारेच आघाडीवर राहिले. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये पोलाद सर्वाधिक वाढ नोंदविता झाला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा