भांडवली बाजाराचा प्रमुख निर्देशांक सेन्सेक्सने मंगळवारी १३७ अंशांनी उसळी घेत, देशात वाहन उद्योगाच्या सप्टेंबरमध्ये विक्रीत झालेल्या चांगल्या सुधारणेबद्दल सकारात्मकता व्यक्त केली. अमेरिकेच्या अर्थव्यवस्था अंशत: ठप्प पडण्याचा उद्भवलेल्या पेचप्रसंगालाही या सकारात्मकतेमुळे गुंतवणूकदारांनी साफ अव्हेरलेले दिसून आले.
सोमवारी मात्र अमेरिकेतील अर्थचिंतेपायी भारतासह जगभरातील प्रमुख शेअर बाजारांमध्ये मोठी घसरण दिसून आली होती. देशाच्या चालू खात्यावरील तूट जरी सरलेल्या तिमाहीत सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या ४.९ टक्के अशी विस्तारली असली, तर बाजार यापेक्षा मोठय़ा तुटीची अपेक्षा करीत होता. सोमवारी शेअर बाजारातील व्यवहार संपल्यानंतर जाहीर झालेल्या या अपेक्षेपेक्षा सरस आकडय़ाबाबत बाजाराने आज दिलासा व्यक्त केला.
शुक्रवार आणि सोमवार असे सलग दोन दिवस ५१४ अंश गमावणाऱ्या सेन्सेक्सने १३७ अंशांची कमाई करून १९५१७.१५ अशी दिवसअखेर पातळी गाठली. निफ्टी निर्देशांकही ४४.७५ अंशांनी वाढून ५७८०.०५ पातळीवर दिवसअखेर स्थिरावला.
स्थावर मालमत्ता, बँक, भांडवली वस्तू आणि वाहन उद्योगातील समभागांना गुंतवणूकदारांकडून बाजारात मोठी मागणी दिसून आली. परिणाम या समभागांनी चांगली कमाई केली. सप्टेंबर महिन्यातील विक्रीचे आकडे सर्वच वाहन उत्पादकांनी चांगले नोंदविले आहेत, त्यातच डिझेलमधील दरवाढीसह पेट्रोलमध्ये पाच महिन्यांत प्रथमच केली गेलेली प्रतिलिटर ३.०६ रुपयांची दरकपातीचे गुंतवणूकदारांकडून स्वागत होताना दिसले. परिणामी वाहन कंपन्यांचे समभाग वधारले असले तरी तेल व वायू तसेच ऊर्जा कंपन्यांच्या समभागांना विक्रीचा फटका बसल्याने घसरण दिसून आली.
रुपया १४ पैशांनी पुन्हा भक्कम!
 अपेक्षेपेक्षा खूपच चांगली सोमवारी जाहीर झालेली चालू खात्यातील तूट तसेच अमेरिकेच्या ‘शट डाऊन’ निर्णयामुळे रोखे खरेदी कार्यक्रम आणखी लांबणीवर टाकले जाण्याच्या अंदाजाने परकी चलन व्यवहारात डॉलर पुन्हा कमकुवत बनला. अमेरिकन चलनाच्या तुलनेत रुपया १४ पैशांनी भक्कम होत ६२.४६ पर्यंत उंचावला. कालच्या किरकोळ अशा ९ पैशांच्या घसरणीनंतर ६२.६० वर स्थिरावलेल्या रुपयाने सकाळच्या व्यवहारात स्थिर सुरुवात केली. दरम्यान त्याने ६२.५६ असा दिवसाचा नीचांकही राखला. मात्र सत्रअखेरआधी निर्यातदारांचा विदेशी चलनाच्या विक्रीच्या सपाटय़ाने रुपया ५२.१७ असा भक्कम बनला.

Story img Loader