जागतिक शेअर बाजारातील तेजीने हुरळून गेलेल्या विदेशी संस्थांगत गुंतवणूकदारांनी भारतीय रिझव्र्ह बँकेच्या किरकोळ व्याजदर कपातीच्या मात्रेने नाराज असलेल्या भांडवली बाजाराला मंगळवारी चांगलाच उठाव दिला. एकाच सत्रात २१५ अंशांची वाढ नोंदवीत सेन्सेक्स १९,८८९ या गेल्या तीन महिन्यांच्या उच्चांकी टप्प्यावर पोहोचला. तर ७२.५० अंश झेपेमुळे निफ्टीदेखील याच कालावधीनंतर ६,००० पार झाला. सर्व १३ क्षेत्रीय निर्देशांकांतील वाढीच्या जोरावर गुंतवणूकदारांची मालमत्ताही आठवडय़ाच्या दुसऱ्या सत्रात तब्बल ६० हजार कोटींनी वधारली.
भांडवली बाजारातील वातावरण गेल्या काही दिवसांपासून स्थिर असेच होते. रिझव्र्ह बँकेच्या व्याजदर कपातीच्या आशेवर १९,५००च्या पुढे वाटचाल करत होता. मात्र अवघ्या पाव टक्क्याची दरकपात करून मध्यवर्ती बँकेने तमाम गुंतवणूकदारांची नाराजी ओढवून घेतली होती. गेल्या सत्रातही त्याने अवघ्या ९८ अंशांची भर घातली होती. विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी या वेळी ८९७.४७ कोटी रुपयांची कामगिरी बजाविली. जागतिक शेअर बाजारात आशियातील काही तर अनेक युरोपीय भांडवली बाजारात तेजीचे वातावरण असल्याने येथेही विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी खरेदीचा जोर लावला. कच्च्या आकडेवारीनुसार, विदेशी गुंतवणूकदारांनी भांडवली बाजारात मंगळवारी १२.१ कोटी डॉलर म्हणजेच ६५५.२१ कोटी रुपये गुंतविले.गेल्या तीन सत्रांपासून तेजीत असलेल्या माहिती तंत्रज्ञान कंपन्यांसह आयटीसी, एचडीएफसी बँक, टाटा मोटर्स, रिलायन्स, स्टेट बँक अशा आघाडीच्या कंपन्यांच्या समभागांमध्ये खरेदीची पसंती दिसून आली. परिणामी सेन्सेक्स १९,९१७.८८ या दिवसाच्या उच्चांकापर्यंत गेला. तर दिवसअखेर शेअर बाजार ३१ जानेवारीनंतर १९,८८८.९५ या वरच्या टप्प्यावर पोहोचला.
सर्व १३ क्षेत्रीय निर्देशांकासह सेन्सेक्समधील तब्बल २५ समभाग वधारले. ग्राहकोपयोगी वस्तू निर्देशांकाने सर्वाधिक २ टक्क्यांची वाढ राखली. बँक, बांधकाम, वाहन क्षेत्रानेही निर्देशांक तेजीला साथ दिली. दिवसअखेर सेन्सेक्स ३१३.३१ अंश वाढ नोंदविता झाला. तर निफ्टीनेही गेल्या तीन महिन्यांत प्रथमच ६,००० चा टप्पा ओलांडला आहे. ७२.५० अंश वाढीमुळे निफ्टी निर्देशांक ६,०४३.५५ पर्यंत पोहोचला.
निफ्टीने मंगळवारचा ६ हजारांवरील स्तर हा ४ फेब्रुवारीनंतर प्रथमच गाठला आहे. त्यात भारती एअरटेल, टाटा मोटर्स, हीरो मोटोकॉर्प, आयटीसी, जिंदल स्टीलसारख्या समभागांचे मोठे योगदान आहे. चार सत्रानंतर खुल्या झालेल्या जपानमधील निक्की निर्देशांकाने तर एकाच व्यवहारात ३.५ टक्के उसळी घेतली आहे.
– संजीव झारबडे,
उपाध्यक्ष-संशोधन, कोटक सिक्युरिटीज
जागतिक भांडवली बाजारातील तेजीसह स्थानिक पातळीवर वायदा व्यवहारात वस्तूंच्या घसरलेल्या किमतींनी शेअर बाजारातील नव्या उत्साहाला खतपाणी घातले आहे. अर्थव्यवस्थेतील पुरेशा रोकड उपलब्धेबाबतही गुंतवणूकदार विश्वास दाखवू लागले आहेत.
– निधी सारस्वत,
वरिष्ठ विश्लेषक, बोनान्झा पोर्टफोलियो
रुपयाच्या दिमतीला चार पैसे
गेल्या सलग तीन व्यवहारांत घसरण नोंदविल्यानंतर डॉलरच्या तुलनेत रुपयाने मंगळवारी ४ पैशांची का होईना वाढ दाखविली. विदेशी चलन बाजारात रुपयाने डॉलरच्या तुलनेत ५४.१४चा स्तर मंगळवारअखेर गाठला. भांडवली बाजारातील तेजी आणि निर्यातदारांकडून आलेला डॉलरचा ओघ हे त्याला कारण ठरले. ५४.२३ पर्यंतच्या घसरणीने व्यवहाराची सुरुवात करणारा रुपयाने दिवसभरात ५४.३६ पर्यंत घसरण, तर ५४.०६ पर्यंतची उंची दाखविली.
चांदीने पुन्हा भरवली धडकी
सराफा बाजारातील पांढऱ्या धातूचे भाव पुन्हा खाली जाऊ पाहत आहेत. मंगळवारी किलोसाठीच्या चांदीचा दर एकदम ९१५ रुपयांनी कमी झाला. यामुळे चांदी या वजनाच्या प्रमाणात ४६,४१० रुपयांवरून थेट ४५,४९५ रुपयांवर आली आहे. गेल्या वर्षांत ७५ हजार रुपयांवर गेलेल्या चांदीच्या विक्रमी दराने गुंतवणूकदारांमध्ये पुन्हा धडकी भरवली आहे. दरम्यान, सोनेदेखील तोळ्यामागे २७ हजारानजीक येऊन ठेपले आहे.