अर्थसंकल्पाच्या मंजुरीवर ‘कोलगेट’ प्रकरणाची काळी छाया असताना, लोकसभेतील प्रमुख विरोधी पक्ष भारतीय जनता पक्षाने वित्तीय संकट टाळण्यासाठी सरकारला दिलेले सहकार्याचे आश्वासन मंगळवारी बाजाराच्या पथ्यावर पडले. अन्यथा या घालमेलीत दिवसभर निर्देशांकाचे वध-घटीचे हिंदोळे सुरू होते. परंतु दिवसाची अखेर सेन्सेक्सने कालच्या तुलनेत ११६ अंशाच्या कमाईने, तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने २६.१ अंशांच्या कमाईने केली. सेन्सेक्स १९५०४.१८ वर तर निफ्टी ५९३०.२० अंशावर दिवसअखेर स्थिरावला.
सकाळी बाजार उघडताच, हिंदुस्थान युनिलीव्हर तब्बल १० टक्के वर उघडून दिवसभरात १७ टक्क्यांपर्यंत वर उंचावला. समभागाने दिवसात ५९७ रुपये हा गेल्या वर्षभरातील उच्चांक स्तर गाठला आणि दिवसअखेर ५८३.६० रुपयांवर विश्राम घेतला. परिणामी मुंबई शेअर बाजाराचे ग्राहकोपयोगी वस्तू निर्देशांकही तब्बल ४.६५ टक्क्यांनी उंचावताना दिसला. बरोबरीने धातू (०.९६ टक्के), आरोग्य निगा (०.८५ टक्के), माहिती-तंत्रज्ञान (०.४१ टक्के) हे निर्देशांक वर होते. आघाडीच्या समभागांमध्ये हिंदुस्तान युनिलीव्हर, आयटीसी, स्टरलाइट, डॉ. रेड्डी, आयसीआयसीआय बँक यांनी मुसंडी मारली. तर खाली जाणाऱ्यांमध्ये हिंडाल्को, एचडीएफसी बँक, लार्सन अॅण्ड टुब्रो, एचडीएफसी व ओएनजीसी यांचा समावेश होता.
अखेरच्या तासाभराच्या सत्रात कालच्या तुलनेत खाली घसरण झालेल्या बाजाराला युरोपीय बाजाराला सकारात्मक संकेतांनी वर ढकलण्यास हातभार लावला. जागतिक बँकेने भारताच्या आगामी आर्थिक विकासदराबाबतचा अंदाज आधीच्या सात टक्क्यांवरून ६.१ टक्क्यांवर खालावल्याच्या बातमीचे बाजारात निराशाजनक पडसाद उमटले. मात्र अर्थमंत्री चिदम्बरम यांनी बाजारातील विदेशी गुंतवणूकदारांच्या पात्रतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या ‘टॅक्स रेसिडेन्सी सर्टिफिकेट’बाबत मळभ दूर करणारे निवेदन अर्थ विधेयकाला मंजुरी देताना केले. विदेशातील सरकारने दिलेल्या प्रमाणपत्रालाच ग्राह्य़ धरण्याची चिदम्बरम यांनी केलेली स्पष्टता बाजाराला सुखावणारी ठरली. त्यातच युरोपियन बँकेच्या गुरुवारी होणाऱ्या बैठकीत पाव टक्क्यांची कपात अपेक्षित असल्यामुळे युरोपातील बाजारांनी तेजीने केलेला प्रारंभही आपल्या बाजारासाठी उपकारक ठरला.
हिंदुस्तान युनिलीव्हरची दमदार मुसंडी
ग्राहकोपयोगी उत्पादनातील अँग्लो-डच जागतिक कंपनी युनिलीव्हर पीएलसीने आपल्या भारतातील उपकंपनी हिंदुस्तान युनिलीव्हरमधील हिस्सा ७५ टक्क्यांवर नेणार असल्याचे आणि त्यासाठी तब्बल २९,३८० कोटी मूल्याची समभाग फेरखरेदी (ओपन ऑफर) करणार असल्याची घोषणा केली. सध्या युनिलीव्हर या मुख्य प्रवर्तकाचा या भारतातील कंपनीत ५२.४८ टक्के हिस्सा आहे. तो ७५ टक्क्यांपर्यंत वाढविण्यासाठी कंपनीने बाजारातून ४८.७० कोटी समभागांची खरेदी करण्याचे प्रस्तावित केले आहे. प्रति समभाग ६०० रुपये भावाने म्हणजे सद्य भावाच्या तुलनेत २१ टक्के अधिक फेरखरेदी भाव निश्चित करण्यात आला आहे. या घोषणेच्या परिणामी शेअर बाजारात मंगळवारी हिंदुस्तान युनिलीव्हरचा भाव तब्बल १०० रुपयांनी (२० टक्के) वाढून ५९७ रुपये अशा वर्षांतील उच्चांकावर जाऊन पोहोचला. दिवसअखेर तो १७ टक्के वाढीसह रु. ५८३.८० वर विसावला असला तरी, परिणामी कंपनीचे बाजारमूल्य एका दिवसात तब्बल १८,५५० कोटींनी वाढून रु. १,२६,१५४ कोटींवर गेले आहे.