स्थिर व्याजदराच्या अपेक्षेपोटी सप्ताहारंभी तीन आठवडय़ांतील सर्वात मोठी निर्देशांक झेप घेणारा सेन्सेक्स मंगळवारी प्रत्यक्षातील अपेक्षापूर्तीने ऐतिहासिक उच्चांकाला पोहोचला. मुंबई निर्देशांक १७३.७४ अंश वाढीने २४,८५८.५९ या सर्वोच्च टप्प्यावर थांबला, तर निफ्टीत ५३.३५ अंश वाढ होत राष्ट्रीय शेअर बाजाराचा हा प्रमुख निर्देशांकही ७,४१५.८५ या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचला.
रिझव्र्ह बँक यंदाही व्याजदरात बदल करणार नाही, या अंदाजाने गुंतवणूकदारांनी सोमवारी समभागांची जोरदार खरेदी करत सेन्सेक्सला एकाच व्यवहारात ४०० हून अधिक अंशांची वाढ नोंदविण्यास भाग पाडले होते. गेल्या तीन आठवडय़ांतील ही सर्वात मोठी निर्देशांक उडी होती; तर मंगळवारी प्रत्यक्षात रिझव्र्ह बँकेचे स्थिर व्याजदराचे पतधोरण जाहीर झाल्यानंतर सेन्सेक्सने २५ हजारानजीक पोहोचत सर्वोच्च टप्पा गाठला. निर्देशांकाने यापूर्वी २५ हजारांचा टप्पा सत्रादरम्यान पार केला आहे. मात्र बंद होताना सेन्सेक्स प्रथमच मंगळवारच्या स्तरावर गेला आहे.
मे महिन्यातील वाहनविक्री वाढ, गेल्या आर्थिक वर्षांत वाढलेला किरकोळ विकास दर या घटनांमध्ये मंगळवारच्या रिझव्र्ह बँकेच्या स्थिर व्याजदराच्या पतधोरणानेही भर टाकली. व्याजदर जाहीर होताना किरकोळ निर्देशांक वाढ राखणारा सेन्सेक्स दिवसाच्या उत्तरार्धात अधिक विस्तारत गेला. दिवसअखेपर्यंत त्याची वाढ सोमवारच्या तुलनेत जवळपास २०० अंशांपर्यंत गेली.
सरकारी रोख्यांमध्ये असलेली गुंतवणूक मर्यादा कमी झाल्याने बँक समभागांमध्ये नफेखोरी दिसू लागली, तर पोलाद समभागांमध्ये काहीशी वाढ पाहायला मिळाली. सेन्सेक्समधील १७ कंपनी समभाग तेजीत राहिले. कोल इंडिया, ओएनजीसी, भेल, हिंदाल्को, एनटीपीसीसारख्या समभागांचे मूल्य ५.३ टक्क्यांपर्यंत उंचावले होते. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये पोलाद ५ टक्क्यांहून अधिक वाढीसह आघाडीवर राहिला. चीनमध्ये औद्योगिक उत्पादन वाढल्याच्या जोरावर येथेही टाटा स्टील, सेसा स्टरलाइटसारखे समभाग वर्षांच्या उच्चांकापर्यंत उंचावले.
रुपया तीन आठवडय़ांच्या नीचांक स्तरावर
परकी चलन व्यवहारात रुपयाची नांगी सलग चौथ्या सत्रातही कायम राहिली. डॉलरच्या तुलनेत रुपया मंगळवारी तब्बल २३ पैशांनी घसरत ५९.३८ पर्यंत खाली आला. गेल्या तीन व्यवहारांपासून स्थानिक चलनात नरमाई आहे. त्यामुळे रुपयातील घसरण या एकूण कालावधीत ४५ पैशांची राहिली आहे. रिझव्र्ह बँकेचे स्थिर व्याजदराचे पतधोरण जाहीर होण्यापूर्वी सकाळच्या सत्रात चलन किरकोळ वधारणेसह मंगळवारची सुरुवात करत होते. मात्र व्यवहारात ५९.४२ पर्यंत नीचांक राखताना त्याने १५ मेनंतरची किमान पातळी गाठली.
सेन्सेक्स-निफ्टीची उच्चांकी झेप! अपेक्षापूर्तीने शेअर बाजारातही हर्ष!
स्थिर व्याजदराच्या अपेक्षेपोटी सप्ताहारंभी तीन आठवडय़ांतील सर्वात मोठी निर्देशांक झेप घेणारा सेन्सेक्स मंगळवारी प्रत्यक्षातील अपेक्षापूर्तीने ऐतिहासिक उच्चांकाला पोहोचला.
First published on: 04-06-2014 at 12:55 IST
TOPICSबिझनेस न्यूजBusiness Newsबीएसई सेन्सेक्सBSE Sensexशेअर बाजारShare Marketस्टॉक मार्केटStock Market
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bse sensex hits record closing high metal stocks surge