मंगळवारच्या सत्रात ऐतिहासिक टप्प्यापासून माघार घ्यावी लागणाऱ्या प्रमुख निर्देशांकांनी बुधवारी पुन्हा तरतरी दाखवीत उच्चांकी टप्पा गाठला. शतकी वाढीसह सेन्सेक्सने, तर ६,८५० नजीक जात निफ्टीने विक्रमी चढाई केली. महिन्यातील वायदा व्यवहारांच्या पूर्ततेच्या अखेरचा दिवशी गुंतवणूकदारांनी भांडवली वस्तू, बँक समभागांना पसंती दिली.
सोमवारनंतर मुंबईसह राष्ट्रीय शेअर बाजाराने मंगळवारी सत्राच्या सुरुवातीला विक्रमी शिखर पादाक्रांत केले होते. मात्र दिवसअखेर दोन्ही प्रमुख निर्देशांकांमध्ये किरकोळ घट नोंदली गेली. बुधवारी पुन्हा बाजारात तेजीचे सत्र सुरू झाले. हे चित्र दिवसअखेरही कायम राहिले. सेन्सेक्स व्यवहारात २२,९१२.५२ पर्यंत, तर निफ्टी ६,८६१.६० पर्यंत झेपावला. दिवसअखेर उत्साह टिकून राहिला आणि ११८.१७ अंशवाढीसह सेन्सेक्स २२,८७६.५४ वर, तर २५.४५ अंश वधारणेसह निफ्टी ६,८४०.८० पर्यंत पोहोचला. गेल्या तीन सत्रांपासून निफ्टीचा ६,८०० वर प्रवास कायम आहे.
सोमवारी भांडवली बाजारांनी १० एप्रिलनंतर सर्वोच्च टप्पा गाठला होता. मात्र मंगळवारी त्यात नरमाई आली. आता पुन्हा बुधवारी प्रमुख निर्देशांक नव्या टप्प्यावर विराजमान झाले आहेत. सेन्सेक्समधील ३० पैकी १८ समभाग बुधवारी वधारले. हिंदाल्को व बजाज ऑटो स्थिर राहिले, तर १० समभागांचे मूल्य रोडावले. २.४८ टक्क्यांसह लार्सन अॅण्ड टुब्रो सेन्सेक्समधील समभागांच्या मुसंडीत आघाडीवर होता.
बऱ्यापैकी तिमाही निष्कर्ष नोंदविणाऱ्या एचडीएफसी बँकेसह आयसीआयसीआय बँक, आयटीसी, गेल यांचे समभाग १.४८ टक्क्यांपर्यंत उंचावले. अॅक्सिस बँक, टाटा स्टील, महिंद्र अॅण्ड महिंद्र, भेल यांनीही निर्देशांक तेजीला साथ दिली. माहिती तंत्रज्ञानातील विप्रोच्या समभाग मूल्यामध्ये तिसऱ्या दिवशीही घसरणच झाली. १.१९ टक्क्यांसह एनटीपीसी, टाटा मोटर्स या समभागांनी घसरणीच्या यादीत स्थान मिळविले.
क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये १.४ टक्क्यांसह भांडवली वस्तूच आघाडीवर राहिला, तर पाठोपाठ बँक, आरोग्य निगा निर्देशांकाचा क्रम होता. बांधकाम, ग्राहकोपयोगी वस्तू, ऊर्जा, तेल व वायू निर्देशांकांमध्ये ०.३३ ते १.२८ टक्के घसरण नोंदली गेली.
लोकसभा निवडणुकीसाठीच्या मतदानामुळे गुरुवारी भांडवली बाजारात व्यवहार होणार नाहीत.
डॉलरमागे ६१ चा तळ!
सलग तिसऱ्या दिवशी घसरण नोंदविणारे भारतीय चलन आता डॉलरच्या पुढे ६१ च्या गाळात गेले आहे. रुपया बुधवारी आणखी ३१ पैशांनी रोडावला. बुधवारचा प्रवास ६१.१९ पर्यंत खाली गेल्यानंतर रुपया दिवसअखेर ६१.०७ या किमान पातळीवर स्थिरावला. सर्वोच्च शिखराला नेऊन ठेवणाऱ्या भांडवली बाजारासाठी विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांना परकी चलनाची निकड भासत असताना रुपयाचे मूल्य मात्र कमी होऊ लागले आहे. महिनाअखेरची वायदापूर्तीसाठीदेखील अमेरिकन डॉलरची वाढती मागणी नोंदली गेल्याने रुपयातील घसरण विस्तारत गेली आहे. सलग तीन व्यवहारांतील रुपयातील घसरण आता तब्बल ७८ पैशांची झाली आहे.
विक्रमी चढाई
मंगळवारच्या सत्रात ऐतिहासिक टप्प्यापासून माघार घ्यावी लागणाऱ्या प्रमुख निर्देशांकांनी बुधवारी पुन्हा तरतरी दाखवीत उच्चांकी टप्पा गाठला.
First published on: 24-04-2014 at 02:49 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bse sensex hits record high for 3rd straight day at 22876 54 larsen toubro gains