आर्थिक सुधारणांचा नवा टप्पा ज्या घटकेपासून सुरू होण्याची अपेक्षा आहे तो हिवाळी अधिवेशनाचा कालावधी सुरू होताच सोमवारी गुंतवणूकदारांनी भांडवली बाजारांना पुन्हा एकदा नव्या विक्रमाची सैर घडवून आणली. सलग ऐतिहासिक टप्पा नोंदविणारा सेन्सेक्स तर आता २८,५०० च्या उंबरठय़ावर, तर निफ्टीने ८,५०० ची वेसही ओलांडली आहे.
एकाच व्यवहारातील दीडशेहून अंश झेपेमुळे मुंबई शेअर बाजार प्रथमच २८,५०० नजीक पोहोचला आहे, तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीनेही ८,५०० हा टप्पा पहिल्यांदाच अनुभवला आहे. सप्ताहारंभी सेन्सेक्स १६४.९१ अंश वाढीसह २८,४९९.५४ पर्यंत, तर निफ्टी अर्धशतकी, ५२.८० अंश वधारणेसह २८,५३०.१५ या नव्या सर्वोच्च टप्प्यावर पोहोचला.
शुक्रवारी दोन्ही प्रमुख निर्देशांकांनी विक्रमी टप्प्यावर आपला प्रवास थांबविला होता. २८,४१३.०१ ने सुरुवात करणारा सेन्सेक्स सोमवारी व्यवहारात २८,५०० च्या पुढे जात २८,५४१.९६ पर्यंत गेला. दिवसअखेर तो २८,५०० च्या काठावर विसावला. शुक्रवारचा २८,३३४.६३ हा विक्रम मोडीत काढणाऱ्या सेन्सेक्सने गेल्या दोन व्यवहारांत ३०१.७८ अंशांची भर नोंदविली आहे.
सेन्सेक्सने यापूर्वीचा व्यवहारातील २८,३६०.६६ हा टप्पा खूपच मागे टाकला, तर निफ्टीने सोमवारच्या सत्रात ८,५३४.६५ हा सर्वोच्च स्तर पाहिला. शुक्रवारीच निफ्टीही ८,४८९.८० या सर्वोच्च टप्प्यावर होता.
८,५३०.१५ वर अखेर करण्यापूर्वी निफ्टीने शुक्रवारचा ८,४७७.३५ हा टप्पाही मोडीत काढला. शुक्रवारी विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी १२२.५० कोटी रुपयांची खरेदी केली होती.
सेन्सेक्समधील ३० पैकी १७ कंपनी समभागांचे मूल्य विक्रमी प्रवासात उंचावले. यामध्ये इन्फोसिस, आयसीआयसीआय बँक, महिंद्र अॅण्ड मिहद्र, भेल, एचडीएफसी बँक, हिरो मोटोकॉर्प, स्टेट बँक, टाटा पॉवर, टीसीएस, विप्रो यांचा समावेश राहिला. पोलाद क्षेत्रातील समभाग मूल्य वाढीबाबत अधिक चमकले. हा क्षेत्रीय निर्देशांकही सर्वाधिक १.८६ टक्के भाव खाऊन गेला.
माहिती तंत्रज्ञान, स्थावर मालमत्ता, बँक आदी क्षेत्रीय निर्देशांकांनीही वधारणेला साथ दिली. निर्देशांकांनी सलग तिसऱ्या सत्रात तेजी नोंदविली आहे. तिन्ही सत्रांतील मिळून सेन्सेक्स वाढ ४६६.६९ अंश झाली आहे. तर येत्या गुरुवारी महिन्यातील वायदापूर्तीचे अखेरचे व्यवहार होणार आहेत.
संसदेच्या यंदाच्या हिवाळी अधिवेशनात आर्थिक सुधारणे संबंधातील अनेक निर्णय घेतले जाण्याची अपेक्षा गुंतवणूकदारांना आहे. त्याच जोरावर गेल्या काही सलग सत्रांपासून भांडवली बाजारही तेजीसह विक्रमाच्या हिंदोळ्यावर आहे. सोमवारी तर त्यात चीनद्वारे व्याजदर कपातीचीही भर पडली. यामुळे तिकडे युरोपातील मध्यवर्ती बँकही आर्थिक उपाययोजना करण्याची चाहूलही गुंतवणूकदारांनी बाजारात व्यवहार करताना दुर्लक्षित केली नाही.
विक्रमाचा धडाका!
आर्थिक सुधारणांचा नवा टप्पा ज्या घटकेपासून सुरू होण्याची अपेक्षा आहे तो हिवाळी अधिवेशनाचा कालावधी सुरू होताच सोमवारी गुंतवणूकदारांनी भांडवली बाजारांना पुन्हा एकदा नव्या विक्रमाची सैर घडवून आणली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 25-11-2014 at 12:58 IST
TOPICSनिफ्टीNiftyबीएसईBSEबीएसई सेन्सेक्सBSE Sensexशेअर बाजारShare Marketस्टॉक मार्केटStock Market
+ 1 More
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bse sensex hits record high of 28500 points