गेल्या आठवडय़ातील निराशा पूर्ण क्षमतेचे झटकून टाकत भांडवली बाजार नव्या सप्ताहाच्या सुरुवातीलाच त्याच्या अनोख्या टप्प्यावर पुन्हा आरुढ झाला. जागतिक शेअर बाजारातील तेजीबरोबरच स्थानिक पातळीवर रिलायन्ससारख्या समभागाने साथ दिल्याने सेन्सेक्स एकाच दिवसात तब्बल ३२६ अंशांची झेप घेत २० हजार पल्याड गेला. तर निफ्टीनेही शतकी उडी घेत राष्ट्रीय शेअर बाजाराला त्याच्या ६ हजाराच्या वरच्या टप्प्यावर पुन्हा आणून ठेवले.
गेल्या संपूर्ण आठवडय़ात शेवटचा दिवस वगळता बाजाराने नकारात्मक कामगिरी नोंदविली होती. शुक्रवारी त्याने किरकोळ वाढ नोंदविली असली तरी सेन्सेक्स २० हजार तर निफ्टी ६ हजारापासून लांबवरच होते.
नव्या आठवडय़ाची सुरुवात करतानाच प्रमुख भांडवली बाजार तेजीसह वाटचाल करू लागले. रिलायन्स कंपनीचा समभाग थेट ५.१२ टक्क्यांनी वधारला. ८२८.२५ रुपयांसह तो गेल्या आठ महिन्याच्या वरच्या पातळीपर्यंत पोहोचला.
गुंतवणूकदारांनी सन फार्मा, (+४.६६%), कोल इंडिया, भेल, डॉ. रेड्डीज, एचडीएफसी बँक, हिंदाल्को, हीरो मोटोकॉर्प, जिंदाल स्टील, टाटा मोटर्स, टीसीएस, विप्रो या आघाडीच्या समभागांचीही खरेदी केल्याने सेन्सेक्स चांगलाच वधारला.प्रमुख निर्देशांकातील २७ कंपन्यांचे समभाग उंचावले होते.
क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये सर्वाधिक ग्राहकोपयोगी वस्तू निर्देशांक ३ टक्क्यांसह उंचावला होता.
अंबानी बंधू तेजीत; आर-कॉमही वधारला
मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रिजबरोबर धाकटे बंधू अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कम्युनिकेशन्सचाही समभाग सोमवारी ५ टक्क्यांनी उंचावला. कंपनीच्या समभागाला शुक्रवारच्या तुलनेत ५.३१ टक्के अधिक भाव मिळत त्याचे मूल्य सोमवारअखेर ११४.०५ रुपयांवर स्थिरावले. दिवसभरात कंपनी समभाग ६.१८ टक्क्यांसह ११५ रुपयांपर्यंत उंचावला होता. कंपनीने महिन्यातील दुसरी मोबाईल दरवाढ जाहिर केल्याचा हा परिणाम होता. आर-कॉमने आपल्या जीएसएम तसेच सीडीएमए तंत्रज्ञानावरील प्रि-पेड मोबाईलचे मुळ शुल्क ३३ टक्क्यांनी वाढविण्याचे जाहिर केले आहे. यानुसार कंपनीचे दर प्रती सेकंद १.५ पैशांवरून २ पैसै झाले आहेत. कंपनीने चालू महिन्याच्या सुरुवातीलाही ३० टक्क्यांनी शुल्क वाढ केली होती.