सलग चौथ्या सत्रात तेजीत राहणारा ‘सेन्सेक्स’ आता महिन्याच्या वरच्या टप्प्यावर पोहोचला आहे. आज एकाच सत्रात २६९.६९ अंश भर घालताना मुंबई निर्देशांक १९,६८३.२३ वर पोहोचला. तर ८२.४० अंश वधारणेने ‘निफ्टी’ ५,९४५.७० वर गेला आहे. गेल्या तीन दिवसांमध्ये मुंबई शेअर बाजाराने तब्बल ५३५.५८ अंशांची वाढ नोंदविली आहे. आजच्याही २७० अंश वाढीमुळे ‘सेन्सेक्स’ने ४ फेब्रुवारीनंतरचा उच्चांक गाठला आहे. राष्ट्रीय शेअर बाजारानेही त्याची ५,९०० ही संवेदनशील पातळी आोलांडली आहे. बाजारात बँकांसह, बांधकाम, भांडवली वस्तू, ग्राहकोपयोगी वस्तूक्षेत्रातील कंपन्यांचेही समभाग वधारत आहेत. ‘सेन्सेक्स’मधील ३० पैकी २५ समभागांचे मूल्य वधारले होते. बाजारात आजच्या तेजीमुळे गुंतवणूकदारांची मालमत्ताही एकाच सत्रात ७५,००० कोटी रुपयांनी उंचावली. ती आता ६७.४० कोटी रुपयांवर पोहोचली आहे. तर मुंबई शेअर बाजारात १,७३० समभाग वधारलेले होते. हवाई आणि वाहन क्षेत्रातील घडामोडींमुळे या कंपन्यांचे समभाग तीव्र हाचलाल नोंदवित होते.
करमुक्त रोख्यांद्वारे जेएनपीटी २००० कोटी उभारणार
देशातील सर्वात मोठे बंदर जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टने करमुक्त रोख्यांच्या विक्रीतून रु. ५०० कोटी उभारणार असल्याची शुक्रवारी घोषणा केली. या रोखेविक्रीला चांगला प्रतिसाद लाभल्यास अतिरिक्त १५०० कोटी रुपये बाळगण्याचा मानस या बंदर उपक्रमाने व्यक्त केला आहे. ही रोखे विक्री येत्या सोमवारी ११ मार्चला खुली होईल आणि १५ मार्चपर्यंत सुरू राहील. हे रोखे मुंबई तसेच राष्ट्रीय शेअर बाजारात नित्य उलाढालीसाठी सूचिबद्ध केले जातील, अशी माहिती जेएनपीटीचे अध्यक्ष एल. राधाकृष्णन यांनी व्यक्त केली. रोखे विक्रीतून उभ्या राहणाऱ्या भांडवलाचा विनियोग मुंबई बंदर कालवा विकसित करण्यासाठी केला जाईल. या प्रकल्पासाठी एकूण खर्च रु. १,५७१.६० कोटी अंदाजण्यात आला असून, तो आगामी २५ महिन्यात पूर्ण होणे अपेक्षित आहे. जेएनपीटी बंदराकडून आजच्या घडीला देशातील ६० टक्के कंटेनर वाहतूक हाताळली जाते.