निवडणूक अंदाजावर विक्रमी प्रतिक्रिया देणाऱ्या भांडवली बाजारांनी प्रत्यक्ष मतमोजणीच्या पूर्वसंध्येला पुन्हा एकदा नवे शिखर गाठले. व्यवहाराच्या सुरुवातीलाच २३,९७० पर्यंत मजल मारणारा सेन्सेक्स दिवसअखेर ९०.४८ अंश भर नोंदवीत २३,९०५.६० या ऐतिहासिक टप्प्यावर पोहोचला.
सत्राची निर्देशांक मजल ही बुधवार बंदच्या तुलनेत जवळपास दीडशे अंश अधिक होती. तर त्याचा दिवसाचा नीचांक २३,७४२.७५ हा राहिला. दिवसअखेर १४.४० अंश वाढीमुळे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीदेखील ७,१२३.१५ या विक्रमी स्तरावर पोहोचला. व्यवहारातील त्याचा प्रवास ७,१५२.५५ ते ७,८२.५५ राहिला.
सोमवारच्या शेवटच्या टप्प्यातील मतदानानंतर सायंकाळी जाहीर झालेल्या अंदाजाची प्रतीक्षा न करता सेन्सेक्ससह निफ्टीने २४ हजारानजीक नवे शिखर गाठले होते. तत्पूर्वी शुक्रवारीही मुंबई निर्देशांक महिन्याभरानंतर विक्रमी टप्प्यावर पोहोचला होता. हाच क्रम मंगळवारीदेखील राहिला.
मंगळवारच्या व्यवहारात २४ हजार गाठल्यानंतर बाजाराने काहीशी माघार घेत बंदअखेरचा विक्रम कायम ठेवला. बुधवारी बाजाराने स्थिरतेसह उसंत घेतली. गुरुवारचे व्यवहार मात्र २३,९७१.७८ या वरच्या टप्प्यावरच सुरू झाले. सत्रात खाली-वर जाणाऱ्या बाजाराने धास्तीदेखील निर्माण केली.
दिवसअखेर मात्र दोन्ही प्रमुख निर्देशांक नव्या विक्रमासह शुक्रवारच्या निकालाच्या स्वागतासाठी सज्ज झाले. १६ लोकसभेसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी शुक्रवार सकाळपासून सुरू होईल. निवडणुकीत भाजपप्रणीत लोकशाही आघाडी सरकार येणार, या अंदाजावरच सेन्सेक्स यापूर्वीच १,५०० अंशांनी उसळला आहे.
मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये गुरुवारी १७ समभाग वधारले. तर तेजीत क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये ग्राहकोपयोगी वस्तू निर्देशांक आघाडीवर होता. एप्रिलमध्ये घाऊक किंमत निर्देशांक काहीसा नरमल्यानेही बाजारात गुंतवणूकदारांनी उत्साह दाखविला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा