गुंतवणूकदारांचा उत्साही कल सलग दुसऱ्या दिवशीही कायम राहिल्याने ‘सेन्सेक्स’ने मंगळवारी २०१३ मधील सत्रातील सर्वात मोठी वाढ नोंदविली. २६५.२१ अंश वाढीने मुंबई निर्देशांक पुन्हा १९ हजाराच्या वर, १९,१४३.१७ पर्यंत पोहोचला. मंगळवारी ‘निफ्टी’ही ८५.७५ अंशाच्या उसळीने ५,७८४.२५ वर गेला. यामुळे गुंतवणूकदारांची मालमत्ताही एक लाख कोटी रुपयांनी वधारली. रिझव्‍‌र्ह बँकेकडून मार्चच्या मध्यावर व्याजदर कपातीची घोषणा केली जाईल, या आशेने बाजारात आज खरेदीला जोर चढलेला दिसून आला.
२०१३ मधील आजची सर्वात मोठी एका दिवसातील झेप होती. यापूर्वी ३२९ अंशांची एकाच सत्रातील उडी मुंबई निर्देशाकाने २९ नोव्हेंबर २०१२ मध्ये घेतली होती. मुंबई शेअर बाजारात सर्व १३ क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये तेजी होती. तर ‘सेन्सेक्स’मधील तब्बल २६ समभाभागांचे मूल्य वधारले होते.
अर्थसंकल्पात सुचविलेल्या प्रत्यक्ष करातील तरतुदींबाबत फेरविचार करण्याच्या केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या विचाराने बाजारात आजचा उत्साह अधिक दुणावला. त्याला रिझव्‍‌र्ह बँकेच्या व्याजदर कपातीच्या आशेचीही किनार लाभली. रिझव्‍‌र्ह बँकेचा मध्य तिमाही पतधोरण आढावा पंधरवडय़ावर येऊन ठेपला आहे. सकाळच्या सत्रापासून तेजीत मात्र स्थिर प्रवास करणारा मुंबई निर्देशांक दुपारनंतर अधिक वधारला. १९,१६० च्या पुढे उच्चांकाला गाठल्यानंतर बाजार तेजीतच बंद झाला.
बँक समभागांची आजची तेजीत उलाढाल झाली. यामध्ये आयसीआयसीआय बँक, भारतीय स्टेट बँक, एचडीएफसी बँक यांचा समावेश राहिला. व्याजदर कपातीच्या शक्यतेने बांधकाम क्षेत्रातील समभागही उंचावले.
रुपया घसरला
दरम्यान, डॉलरच्या तुलनेत रुपया आज पुन्हा नरमला. सकाळच्या सत्रात सोमवारच्या तुलनेत ११ पैशांची भर घालणारा रुपया आज दिवसअखेर ६ पैशांनी खाली येत ५४.९२ पर्यंत घसरला. भारतीय चलनाने कालच्या सत्रात स्थिरता नोंदविली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा