विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी भांडवली बाजारातील रस आठव्या सत्रातही दाखविल्याने प्रमुख निर्देशांक गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी नव्या उच्चांकावर पोहोचले. जवळपास सव्वाशे अंश वाढीने सेन्सेक्स २६,३०० पर्यंत गेला. तर निफ्टीने पहिल्यांदाचा ७,८०० पातळी ओलांडली.
१२४.५२ अंश वाढीसह मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २६,२७१.८५ वर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ३४.८५ अंश वधारणेसह ७,८३०.६० पर्यंत पोहोचला. व्यवहारातील बंदसोबतच सत्रातील सर्वोच्च झेपही गुरुवारच्या व्यवहाराने मागे टाकली गेली आहे.
भारतातील आघाडीच्या कंपन्यांच्या वाढत्या नफ्यातील तिमाही वित्तीय निष्कर्षांमुळे भांडवली बाजार हुरळून गेला आहे. असे असताना विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांद्वारे समभागातील खरेदी वाढली आहे. आशियातील तेजीच्या भांडवली बाजारांचीही साथ मिळत आहे.
बुधवारी नव्या उच्चांकाला गवसणी घातल्यानंतर भांडवली बाजाराची गुरुवारच्या सत्राची सुरुवात सावध झाली. अगदी दुपापर्यंत हे चित्र होते. मात्र व्यवहार संपण्याच्या तासभर आधी बाजारात उसळी आली. सेन्सेक्स या वेळी थेट २६,२९२ पर्यंत झेपावला. मुंबई शेअर बाजारात पोलाद, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील समभागांना मागणी राहिली. तर ग्राहकोपयोगी वस्तू, औषधनिर्मिती, ऊर्जा क्षेत्रातील समभागांमध्ये नफेखोरी नोंदली गेली. आयटीसी, इन्फोसिस, रिलायन्स, एचडीएफसी बँक, टाटा स्टील, हिंदुस्तान यूनिलिव्हर, हिंदाल्को, विप्रोचे समभाग वधारले. सेन्सेक्समधील २१ समभागांचे मूल्य उंचावले. पोलाद निर्देशांक सर्वाधिक १.४७%सह आघाडीवर राहिले.
तीन दिवसांत विदेशी गुंतवणूकदारांची १,२२५ कोटींची खरेदी
गेल्या आठ सत्रात मिळून सेन्सेक्सने १,२६५ अंशांची तर निफ्टीने ३७६.४५ अंशांची भर घातली आहे. सप्टेंबर २०१२ नंतरची सेन्सेक्स-निफ्टीची सलग तेजीची ही सर्वात मोठी शृंखला आहे. २०१४ मध्ये आतापर्यंत सेन्सेक्स २४ टक्क्यांनी उंचावला असताना विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी याच कालावधीत १२ अब्ज डॉलरची गुंतवणूक भांडवली बाजारात केली आहे. गेल्या केवळ तीन दिवसांत विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी १,२२५ कोटी रुपयांची खरेदी शेअर बाजारात केली.
विमा समभागांमध्ये चैतन्य
थेट विदेशी गुंतवणूक मर्यादावाढीची भेट मिळालेल्या देशातील विमा क्षेत्रात चैतन्य पसरले असून गुरुवारी भांडवली बाजारात या व्यवसायाशी संबंधित समभागांचे मूल्य पाच टक्क्यांपर्यंत वाढले. रिलायन्स- अनिल धीरुभाई अंबानी समूहातील रिलायन्स कॅपिटलचा समभाग ४.०५ टक्क्यांनी तर मॅक्स इंडियाचे समभाग मूल्य ०.९१ टक्क्यांनी उंचावले. आदित्य बिर्ला नुवोही ०.५६ टक्क्यांनी वधारला.
परतावा स्वीकारण्यासाठी शनिवार-रविवारच्या  सुट्टीतही प्राप्तिकर कार्यालये सुरू राहणार
करदात्यांना प्राप्तिकर परतावा भरणे सुलभ होण्यासाठी सुटीच्या दिवशीही कार्यालये सुरू ठेवण्यात येणार आहे. यानुसार शनिवार, २६ जुलै व रविवारी २७ जुलै रोजी कार्यालयीन कालावधीत प्राप्तिकर परतावा अर्ज भरता येतील, असे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने स्पष्ट केले आहे. मंगळवारी रमजान ईदनिमित्त कार्यालये बंद राहतील. तर ३० व ३१ जुलै रोजीदेखील करदात्यांना प्राप्तिकर परताव्यासाठी अर्ज सादर करता येईल. प्राप्तिकर परताव्यासाठीची अखेरची मुदत ३१ जुलै रोजी संपत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा