४८१ अंशांची भर पडून निर्देशांक तीन महिन्यांच्या वरच्या टप्प्यावर
वाढीव पावसाच्या अंदाजानंतर बुधवारच्या प्रमुख निर्देशांक झेपेसाठी फेब्रुवारीमधील वाढलेले औद्योगिक उत्पादन दर व मार्चमध्ये सावरलेली महागाईचे निमित्त ठरले. एकाच व्यवहारातील ४८१.१६ अंशवाढीने सेन्सेक्स २५,६२६.७५ वर पोहोचला, तर १४१.५० अंशवाढीमुळे निफ्टी ७,८५०.४५ पर्यंत झेपावला. बँक, वाहन क्षेत्रातील समभागांच्या खरेदीच्या जोरावर प्रमुख निर्देशांक आता गेल्या साडेतीन महिन्यांच्या वरच्या टप्प्यावर पोहोचले आहेत.
भांडवली बाजार गुरुवारी डॉ. आंबेडकर जयंती व शुक्रवारी रामनवमीनिमित्त बंद आहेत. बाजारात आता थेट येत्या सोमवारीच व्यवहार होणार आहेत. चालू आठवडय़ात सेन्सेक्सने ९५२.९१, तर निफ्टीने २९५.२५ अंशवाढ नोंदविली आहे. टक्केवारीत ती अनुक्रमे ३.८६ व ३.७६ राहिली आहे. यामुळे गेल्या सलग दोन साप्ताहिक घसरणीलाही यंदाच्या आठवडय़ात पायबंद घातला गेला. चालू आठवडय़ात बाजारात तीनच दिवस व्यवहार झाले.
स्कायमेट तसेच भारतीय वेधशाळेच्या सकारात्मक पावसाच्या अंदाजामुळे बाजारात मंगळवारी तेजी होती. मार्चमध्ये ५ टक्क्य़ांखाली आलेला महागाई दर व फेब्रुवारीत २ टक्क्य़ांपुढे गेलेले औद्योगिक उत्पादन या वृत्तांची भर बुधवारच्या सत्रादरम्यान पडली. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने चालू आर्थिक वर्षांसाठी अंदाजित केलेल्या भारताच्या वाढीव विकास दराची दखलही भांडवली बाजाराने घेतली.
मुंबई शेअर बाजाराची बुधवारच्या सत्राची सुरुवातच थेट ३७५ अंशवाढीसह झाली. सेन्सेक्स या वेळी २५,५०० च्या पुढे गेला होता. सत्रात तो २५,६७१ पर्यंत उंचावला, तर निफ्टीने बुधवारच्या व्यवहारात ७,८६४.८० पर्यंत झेप घेतली. दिवसअखेर मुंबई निर्देशांकाने गाठलेला टप्पा हा १ जानेवारी २०१६ नंतरचा सर्वोच्च ठरला.
सेन्सेक्समध्ये केवळ दोन समभाग वगळता ३० पैकी इतर सर्व २८ समभागांचे मूल्य वाढले. यामध्ये बजाज ऑटो, भेल, मारुती सुझुकी, टाटा मोटर्स, हिरो मोटोकॉर्प, हिंदुस्थान युनिलिव्हर, टाटा स्टील, आयटीसी, स्टेट बँक, एचडीएफसी, रिलायन्स, सिप्ला, अॅक्सिस बँक हे आघाडीवर होते. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये वाहन निर्देशांक सर्वाधिक ३.५९ टक्क्य़ांसह पुढे राहिला. सोबतच बँक (२.५६%), स्थावर मालमत्ता (१.६९%), ऊर्जा (१.३७%) निर्देशांकही वाढले. मुंबई शेअर बाजारातील मिड व स्मॉल कॅप निर्देशांक एक टक्क्य़ापर्यंत वाढ नोंदवीत होते.
गुंतवणूक मत्तेत १.३५ लाख कोटींचा वर्षांव
मुंबई : यंदा सरारीपेक्षा अधिक मान्सून होण्याच्या अंदाजावर झेपावलेल्या शेअर बाजारात बुधवारी वधारलेल्या खरेदीने अनेक समभागांनी मूल्यवृद्धी साधली. गुंतवणूकदारांची मत्ता एकाच व्यवहारात १.३५ लाख कोटी रुपयांनी वाढली. सेन्सेक्सने २०१६ मधील सर्वोच्च टप्पा गाठतानाच, बाजाराचे एकूण बाजारमूल्यही ९६.९२ कोटी रुपयांवर गेले.