भारताचे गुंतवणूकविषयक पतमानांकन ‘स्टॅन्डर्ड अॅण्ड पूअर्स’कडून उंचावल्यानंतर त्याला सकारात्मक असा प्रतिसाद भांडवली व परकी चलन बाजारांनी दिला. सप्ताहअखेर यामुळे सेन्सेक्ससह निफ्टी, तर डॉलरच्या तुलनेत रुपयाची स्थिती अधिक मजबूत झाली.
व्यवहारात दिवसाच्या तळात येणारा सेन्सेक्स यामुळे दिवसअखेर १५७.९६ अंशांनी उंचावत २६,५००च्या वर २६,६२६.३२ पर्यंत गेला. तर निफ्टीत ५७ अंश वाढ होत निर्देशांक ८ हजारानजीक ७९६८.८५ वर पोहोचला. सुधारलेल्या पतमानांकनाने बाजाराला निराशेच्या दाढेतून बाहेर काढले.
व्यवहारात गुरुवारच्या तुलनेत २४८ अंशांची आपटी नोंदविणाऱ्या मुंबई शेअर बाजाराने काहीशी धास्ती निर्माण केली. घसरणीसहच सप्ताहअखेरच्या सत्राची सुरुवात करणारा सेन्सेक्स व्यवहारात २६,२२०.४९ पर्यंत घसरला. गेल्या दीड महिन्यातील ही नीचांक पातळी होती.
सेन्सेक्समधील १९ समभागांचे मूल्य उंचावले. यामध्ये हिंदाल्को, सन फार्मा, महिंद्र अॅण्ड महिंद्र, डॉ. रेड्डीज लेबोरेटरी, एचडीएफसी, हीरो मोटोकॉर्प यांना भाव मिळाला. कोळसा खाणी रद्द झाल्यानंतर घसरलेल्या समभागांचा पोलाद निर्देशांक शुक्रवारी क्षेत्रीय निर्देशांकात २.४९ टक्क्यांसह अव्वल राहिला. चालू सप्ताहात तीन व्यवहारात सेन्सेक्स ७३८.३८ अंशांची आपटी नोंदविणारा ठरला. तर सप्ताह तुलनेत मुंबई निर्देशांक ४६१.१० अंशांनी पुढे आहे.
रुपयाही वधारला!
सलग चार सत्रातील घसरण स्थानिक चलनाने सप्ताहअखेर मोडून काढली. डॉलरच्या तुलनेत रुपया १९ पैशांनी वधारत ६१.१५ पर्यंत गेला. गुरुवारच्या ६१.३४ या बंद टप्प्यानंतर, शुक्रवारची सुरुवात ६१.४६ या घसरत्या क्रमानेच झाली. व्यवहारात चलन ६१.६२ पर्यंत रोडावले. चलनाचा हा स्तर ८ ऑगस्टनंतरचा (६१.७४) किमान स्तर होता. पुढे मात्र त्यात सुधार होत रुपया ६१.१५ वर बंद झाला. या आधीच्या सलग चार व्यवहारात रुपया ५३ पैशांनी कमकुवत बनला आहे. दरम्यान, सराफा बाजारात शुक्रवारी संमिश्र वातावरण पाहायला मिळाले. सोने दरात भर पडली तर चांदीच्या दरामध्ये किरकोळ नरमाई नोंदली गेली.
उन्नत मानांकनाने उफाण!
भारताचे गुंतवणूकविषयक पतमानांकन ‘स्टॅन्डर्ड अॅण्ड पूअर्स’कडून उंचावल्यानंतर त्याला सकारात्मक असा प्रतिसाद भांडवली व परकी चलन बाजारांनी दिला.

First published on: 27-09-2014 at 04:46 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bse sensex nifty upgrades